मुंबई: अभिज्ञा भावे सध्या तू तेव्हा तशी या मालिकेत खलनायिकेचं पात्र वठवतेय. आजपर्यंत बहुधा तिने नायक आणि नायिकेत खो घालण्याच्याच भूमिका केल्या. पण या तिच्या भूमिकांवरही चाहत्यांनी मनसोक्त प्रेम केलं. दीड वर्षापूर्वी अभिज्ञाने मेहुल पै या मित्राशी लग्न केलं आणि ती संसाराला लागली. पण सहा महिन्यांपूर्वी तिचा नवरा मेहुल पै याला कॅन्सरने गाठलं. नवऱ्याच्या या आजाराच्या काळात अभिज्ञाने त्याला खूप साथ दिली. बळ दिलं. आता मेहुल कॅन्सरमुक्त झाला आहे. यासाठीही अभिज्ञाचं चाहत्यांनी खूप कौतुक केलं. पण आता मात्र अभिज्ञानं तिच्या नवऱ्याचं नावच बदललं आहे. तिच्या नावापुढे ती मेहुल नव्हे तर दुसरच नाव लावत्येय. हे बघून मात्र चाहत्यांना काय बोलावं कळेनासं झालंय. काय आहे नेमकं प्रकरण हे जेव्हा अभिज्ञाने सांगितलं तेव्हा उलगडा झाला.


अभिज्ञाने हा निर्णय घेतलाय तो फक्त आणि फक्त नवरा मेहुलमुळेच. आता तुम्ही म्हणाल नवऱ्याचं नाव बदलण्याच्या निर्णयाला नवराच कारणीभूत होण्यासारखं झालंय तरी काय? पण थांबा, भलतेसलते विचार मनात आणू नका. अभिज्ञाने मेहुललाच नवं नाव दिलं आहे आणि तेही त्याच्या गोड स्वभावामुळे. अभिज्ञाने तिच्या फोनमध्ये मेहुलचं नाव अॅपल असं ठेवलं आहे. त्यामुळे सध्या ती सौ. अभिज्ञा मेहुल पै नव्हे तर सौ. अभिज्ञा अॅपल पै झाली आहे.

अभिज्ञा म्हणाली, एक नातं जेव्हा तुटते आणि पुन्हा आपण नव्याने आयुष्य सुरू करण्याचा विचार करतो तेव्हा तुम्हाला भेटलेली व्यक्ती समजून घेणारी असावी असं वाटत असतं. माझ्या आयुष्यात मी एकदा ठोकर खाल्यावर मेहुल जेव्हा माझ्या आयुष्यात आला तेव्हा मला खूप आनंद झाला. मेहुलची बायको म्हणून वावरताना तो किती समजूतदार आहे याची जास्त जाणीव झाली.


तो स्वभावाने इतका गोड आहे की मी अगदी त्याला सहजपणे अॅपलची उपमा दिली. खरच तो अॅपलसारखा आहे. मग काय मी त्याला अॅपल अशीच हाक मारते. इतकेच नव्हे तर माझ्या फोनमध्ये मेहुलचे नाव ‍अॅपल या नावाने सेव्ह केले आहे. आता जेव्हा तो फोन करतो तेव्हा स्क्रिनवर मिस्टर अॅपल असे दिसते. प्रेमातल्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद मला या अॅपल पै याने दिल्या आहेत.

लगोरी या मालिकेपासून अभिज्ञाचा छोट्या पडद्यावरचा प्रवास सुरू झाला. सूर सपाटा या सिनेमातही ती दिसली होती. तुला पाहते रे मालिकेतील मायरा, खुलता कळी खुलेना या मालिकेतील मोनिका, रंग माझा वेगळा या मालिकेतील तनुजा अशा खलनायिका तिने उत्तम साकारल्या. अभिनयासोबत अभिज्ञा साडी डिझायनर आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्यासोबत अभिज्ञाचा तेजाज्ञा हा साडी डिझायनिंग फॅशन ब्रँडचा व्यवसाय जोमात सुरू आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.