मुंबई : वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत द्विशतक झळकावले गेल्याचे सर्वांनाच माहिती आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये पहिले द्विशतक झळकावले होते. पण आता तर वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले गेले आहे. तब्बल ४९ चौकार आणि एका षटकारासह हे त्रिशतक आता क्रिकेट विश्वात पाहायला मिळाले आहे.
कोणत्या खेळाडूने रचले ऐतिहासिक त्रिशतक, जाणून घ्या…
वनडे क्रिकेटमध्ये त्रिशतक होऊ शकते, यावर बऱ्याच जणांचा अजूननही विश्वास बसत नाही. पण ही गोष्ट घडलेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले गेले आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टेफन नेरोने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत वनडेतील पहिले त्रिशतक झळकावले आहे. नेरोने यावेळी अंध आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात १४० चेंडूंमध्ये ३०९ धावांची खेळी साकारली आणि वनडे क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावण्याचा मान त्याने पटकावला आहे. यापूर्वी अंधांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा यष्टीरक्षक मसूद जन याने १९९८ साली अंधांच्या विश्वचषकात २६२ धावांची खेळी साकारली होती. हा विक्रम आता नेरोने मोडीत काढला आहे. नेरोने हा विक्रम मोडीत काढत असतानाच पहिला त्रिशतक झळकावण्याचा मानही पटकावला आहे.
यापूर्वी नेरोने सलग दोन शतकं झळकावली होती. नेरोने ४६ चेंडूंत ११३ आणि ४७ चेंडूंत १०१ धावांची खेळी साकारली होती. सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावल्यावर नेरो म्हणाला की, ” ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणं हे माझं स्वप्न होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून खेळताना शतक झळकावणं ही अविस्मरणीय गोष्ट आहे. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही.”

नेरोच्या त्रिशतकाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ४० षटकांत २ विकेट्स गमावत ५४१ धावा केल्या होत्या. हा सामना ऑस्ट्रेलियाने २६९ धावांनी जिंकला. या मालिकेत आतापर्यंत न्यूझीलंडला एकही विजय मिळवता आलेला नाही. आतापर्यंतच्या सहा वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानेच विजय मिळवले आहेत. या मालिकेत अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरीत दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.