मुंबई : ‘टाईमपास ३’ सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रवी जाधव यांनी मटा ऑनलाईशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींना, प्रसंगांना रवी यांनी उजाळा दिला आहे. या आठवणींना उजाळा देताना रवी जाधव यांनी प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्याशी निगडीत एक हृदय आठवण सांगितली आहे.

काय म्हणाले रवी

अशोक सराफ यांचा चाहता महाराष्ट्रात नसेल असा एकही सिनेप्रेमी सापडणार नाही. याच सिनेप्रेमींच्या यादीत प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचंही नाव येतं. अशोक सराफ यांच्यावर असलेल्या प्रेमासंदर्भातील एक हृदय आठवण रवी यांनी मटा ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘आज मी सिनेमाविश्वात काम करत आहे. जेव्हा माझ्याकडे चाहते येतात आणि सेल्फी, सोबत फोटो काढण्याची मागणी करतात तेव्हा मी त्यांना कधीच नाही म्हणत नाही. यामागे मुख्य कारण अशोक सराफ आहेत.’ असं का असा प्रश्न त्यांना विचारला असता रवी यांनी सांगितलं की, ‘ मी जेव्हा जाहिरात क्षेत्रात काम करत होतो तेव्हा झीसाठी पहिल्यांदा जाहिराती केल्या. त्यांनी आयोजित केलेल्या एका सिनेमाच्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मी मेघनाबरोबर गेलो होतो. त्यावेळी तिथं मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. अनेकजण त्यांच्या सह्या घेण्यासाठी, त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी जात होते. त्या कलाकारांमध्ये अशोक सराफ देखील होते. त्यांना पाहिलं आणि फक्त त्यांच्याबरोबर फोटो काढण्याची आणि सही घेण्याची माझी इच्छा झाली. मी त्यांच्याजवळ गेलो त्यांना नमस्कार करत सही आणि फोटो काढण्याची विनंती केली. त्यांनी देखील मोकळेपणानं माझी विनंती मान्य केली. माझ्या आवडत्या कलाकाराला इतक्या जवळून पाहण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. कृतकृत्य झाल्याची भावना माझ्या मनात आली होती. त्यामुळेच आज जेव्हा माझ्याकडे कुणी सहीसाठी, फोटोसाठी येतो तेव्हा मी निःसंकोचपणं तयार होतो. त्यांना हवा तसा फोटो मी काढू देतो. त्यांच्याशी अगदी सहजपणं संवाद साधतो.’

कुटुंबामुळे आजही मी जमिनीवरच

झगमगत्या मनोरंजन विश्वामध्ये वावरत असूनही रवी जाधव अतिशय साधे आहेत. मनोरंजन विश्वातील स्टारडम, वलय यांपासून ते कोसो दूर आहेत. याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘याचं मुख्य कारण माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातील कुणीही या विश्वाशी निगडीत नाहीत. माझा मोठा भाऊ आजही ठाण्यात रिक्षा चालवतो. त्यामुळे आमच्यासाठी रिक्षा हीच गाडी होती. त्यामुळेच टाईमपास ३ सिनेमात ‘रिक्षाच्या हॉर्नमधून आली वाघाची डरकाळी’ हे गाणं घेतलं आहे. त्याच्याशी मी खूप रिलेट करतो. माझे वडील, भाऊ यांच्यापैकी कुणीही माझ्या सिनेमाच्या कार्यक्रमाला, अथवा प्रीमिअरला येत नाहीत. ते आजही माझा सिनेमा सिनेमागृहात जाऊन तिकीट काढून बघतात. त्यांना सिनेमा आवडला तर मला येऊन आवर्जून सांगतात. माझ्या बाबांची स्कूटर होती. त्यामुळे आजही मी ठाण्यात जेव्हा केव्हा फिरतो तेव्हा स्कूटरवरून फिरतो.’

मी नेमकं काय करतो हे घरच्यांना माहिती नाही

मनोरंजन विश्वातील आघाडीचे सिने दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांचं नाव घेतलं जातं. परंतु ते नेमकं काय करतात हे त्यांच्या पालकांना, भावांना ठावूक नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याबाबत रवी यांनी सांगितलं की, ‘मी सिनेमा करतो म्हणजे नेमंक काय करतो हे आई-बाबांना, भावाला माहिती नाही. ते फक्त माझा सिनेमा बघतात आणि आवडला की नाही ते सांगतात. अगदी माझ्या कोकणातील संगमेश्वरमधील कासे नावाच्या छोट्याशा गावात राहणाऱ्या नातेवाईकांना देखील मी नेमकं काय करतो हे माहिती नाही. त्यामुळे त्यांचं माझ्याशी वागणं अतिशय साधं असतं.त्यात कोणताही बडेजाव नसतो. त्यात कृत्रिमपणा नसतो. असंत ते केवळ निर्व्याज प्रेम आणि माया. त्यांच्या या निरपेक्ष प्रेमामुळेच आजही मी जमिनीवर आहे. मी आजही ठाण्यात राहतो. अनेकांनी मला ठाण्यात स्कूटरवरून फिरताना, वडापाव खाताना पाहिलं असेल. मी असाच आहे आणि असंच राहिला मला आवडतं,’ असंही रवी यांनी आवर्जून सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.