अग्रलेख

काँग्रेस अखेर रस्त्यावर

एका बाजूला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये इतर विरोधकांच्या साथीने आवाज उठविल्यानंतर काँग्रेसने शुक्रवारी रस्त्यावर उतरून देशभरात जन आंदोलन केले. विशेष म्हणजे, आजही काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका असे तिघेही सदस्य एकाचवेळी या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसने ‘ब्लॅक फ्रायडे’ असे याला नाव दिले होते. त्यामुळे बरेच नेते काळ्या पोषाखात होते. दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांना इतकी ताकद लावून नेस्तनाबूत करण्याची काही गरज नव्हती. ते काही हिंसा करत नव्हते. तरीही, पाण्याचे वेगवान फवारे मारून व गाड्यांमध्ये भरून त्यांना हटविण्यात आले. या आक्रमक कारवाईमधून काँग्रेसचे खासदारही सुटले नाहीत. राजधानी दिल्लीप्रमाणे राज्यांच्या राजधान्या आणि मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसने हे आंदोलन केले. बऱ्याच काळाने काँग्रेस पक्ष देशभरात असा एकजुटीने आंदोलन करताना दिसला. संपूर्ण देशभरात अस्तित्व असणारा एकमेव विरोधी राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या या क्रियाशीलतेचे स्वागत आणि कौतुक करायला हवे. या आंदोलनास प्रत्यक्ष तोंड फोडण्यापूर्वी राहुल गांधी यांनी घेतलेली पत्रकार परिषद नेहेमीपेक्षा बरीच आक्रमक होती आणि त्यांनी ‘हिटलरशाही’पासून एकही आरोप करावयाचा बाकी ठेवला नाही. या पत्रकार परिषदेत अनेकांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’चा मुद्दा काढला. मात्र, तो आजचा विषय नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी आंदोलनाचा मुद्दा भरकटू दिला नाही. अर्थात, काँग्रेसचे हे आंदोलन आणि अंमलबजावणी संचालनालयाने चालविलेली कारवाई हे एकाच वेळी होत असल्याने भाजपने या दोन्हींचा संबंध जोडणे, स्वाभाविकच होते. तशी निवेदने भाजपच्या अनेक नेत्यांनी त्वरेने दिलीही.

राहुल यांच्या पत्रकार परिषदेत राजस्थानचे संयमी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना महत्त्वाचे स्थान होते. काही काळापूर्वी राहुल अध्यक्ष होण्यास तयार नसतील आणि सोनिया पद सांभाळू शकत नसतील तर गेहलोत यांच्याकडे पक्षाचा कारभार सोपवावा, अशी कल्पना पुढे आली होती. राहुल यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष स्वीकारण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतरही गेहलोत यांनी ‘गेली ३२ वर्षे (म्हणजे राजीव गांधी यांचे सरकार १९८९ मध्ये गेल्यापासून) गांधी कुटुंबातील एकही सदस्य एकाही सरकारी अधिकारपदावर एक दिवसही नव्हता,’ असे विधान केले. ते सूचक होते. भाजपच्या घराणेशाहीच्या आरोपाला दिलेले ते उत्तर होते. याचवेळी, जयराम रमेश यांनी ‘राहुल यांना तुम्ही इथे काहीही विचारू शकता पण देशात काही जण आठ आठ वर्षे एकही पत्रकार परिषद घेत नाहीत,’ असे म्हणून पंतप्रधानांना टोमणा मारला. या पत्रकार परिषद तसेच आंदोलनानंतर भाजप प्रवक्त्यांनी व नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही अनावश्यक आक्रमक होत्या. राहुल गांधी यांनी जोरकसपणे मांडलेला महागाईचा मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. तो मांडताना त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कडवट टीका केली. आज देशभरात इंधनापासून सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमाल भडकले आहेत. दर महिन्याला वाढणारे जीएसटीचे आकडे म्हणजे सगळे आबादीआबाद आहे, असे नाही. काँग्रेसच्या आंदोलनातून हा मुद्दा व्यवस्थित पुढे आला. आता खरा प्रश्न आहे तो म्हणजे, काँग्रेसला हा उत्साह आणि देशव्यापी कार्यक्रम कितपत व किती काळ टिकवता येतो हा.

काँग्रेसला विरोधात बसण्याची सवय अनेक दशके नव्हती. मात्र, मोदींच्या पहिल्या कार्यकाळात काँग्रेसने ती लावून घेणे आवश्यक होते. आताही राहुल यांनी एका दिवसाचे प्रतीकात्मक आंदोलन संपल्यानंतर आपण काय करणार आहोत, हे आपल्या पाठिराख्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवे. राहुल गांधी हे लवकरच ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ असा देशव्यापी दौरा करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या खऱ्या ठरल्या तर काँग्रेस कार्यकर्तेही उत्साहाने पुढे येतील. खरेतर, १९७७ मधील पराभवानंतर आपली आजी इंदिरा गांधी आणि १९८९ मधील पराभवानंतर वडील राजीव गांधी यांनी किती जिद्दीने, परिश्रमांनी आणि सामान्य भारतीयांशी संवाद साधत संघर्ष केला, हे राहुल व प्रियांका यांना माहीत असेल. तो धडा लक्षात ठेवला तर हे आंदोलन ही जनतेच्या असंतोषाला जशी वाट ठरू शकते, तसेच ती काँग्रेसच्या पुनर्बांधणीची संधीही ठरू शकते. ‘मी कुणाला घाबरत नाही,’ हे राहुल गांधी यांचे विधान खरे ठरायचे तर त्यांना तळागाळातल्या काँग्रेसवर अनेक दशके निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाही निर्भय व क्रियाशील बनवावे लागेल. केंद्रीय यंत्रणांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात गांधी कुटुंबाची जबर कोंडी केली असून हे प्रकरण पुढे कुठवर न्यायचे, याचा निर्णय राजकीय असणार आहे. त्या राजकारणाला उत्तर द्यायचे तर सतत लोकांमध्ये जाणे आणि लोकांमध्ये मुरून राहणे, हेच आवश्यक आहे. हा मार्ग अनुसरला तरच काँग्रेस पक्ष तरेल आणि उद्या लढाईत हिरीरीने उतरू शकेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.