मुंबई : “आपली प्राणप्रिय संघटना शिवसेना फोडण्याचे गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचा यांचा डाव आहे. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. आतापर्यंत गुलाब पाहिले. आता त्यांनी काटे बघायला तयार राहावं”, असा इशाराच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गेल्या महिनाभराच्या राजकारणाचं त्यांनी सिंहावलोकन करताना बंडखोरांवर तोफ डागली. तर शिवसेना संपत चालेलला पक्ष म्हणणाऱ्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डांना जशास तसं उत्तर दिलं. “आजपर्यंत शिवसेनेच्या वाट्याला आव्हानं काय कमी आलेली नाहीत. संघर्ष हा शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे सध्या आलेलं आव्हान शिवसेनेसाठी नवीन नाही. मी सांगू इच्छितो, गुलाब गेले असतील तरी गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलविन”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये जान भरली.

गुलाबाचे झाड माझ्याकडे, पुन्हा नवीन गुलाब फुलविन : उद्धव ठाकरे
संघटना बांधणीचं काम जोमाने करायचंय

“आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईतही आपण मागे नाही आहोत. दिग्गज वकील आपल्यासाठी लढतायेत. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षीय पातळीवर आपल्याला संघटना बांधणीचं मोठं काम हाती घ्यायचंय. त्याची सुरुवात १५ दिवसांपूर्वी झालेली आहे. शिवसेना पक्ष सदस्य नोंदणीचं काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आता तुम्ही शपथपत्रांचे गठ्ठे आणले आहेत, तसेच गठ्ठेच्या गठ्ठे मला हवे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सेना कुणाची? निर्णय द्यायला सुप्रीम कोर्टाची चालढकल, पृथ्वीबाबांची नाराजी, म्हणाले, कोर्टाचं चाललंय काय?
उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डा यांना उत्तर

“आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे मी आधीच बोललो होतो. परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं कि शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय”, असंही ठाकरे म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.