म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी मुंबईत राजभवन येथील जलभूषण इमारत आणि क्रांतिकारक गॅलरीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिल्याने या मंचावरून हे दोन्ही नेते आरोप-प्रत्यारोपाचा ‘सामना’ रंगवणार का, याविषयी उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून राज्यात जोरदार कारवाया सुरू आहेत. राज्यातील भाजपला केंद्रातील यंत्रणांकडून अभय असल्याचा आरोप राज्यातील नेत्यांकडून केला जात आहे. एप्रिलमध्ये स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकाच व्यासपीठावर येतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर उल्लेख नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचे समजते. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही परस्परविरोधी पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.