म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ः म्हाडा प्राधिकरणाच्या महाराष्ट्रातील विविध मंडळांतील घरांच्या सोडतीतील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत नवीन महत्त्वाचा बदल झाला आहे. राज्याच्या गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार अत्यल्प गटातील व्यक्तीला म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गटासह उर्वरित तिन्ही म्हणजे अल्प, मध्यम, उच्च उत्पन्न गटांमध्ये अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटात अर्ज करू शकते. मात्र, अत्यल्प आणि अल्प गटातील अर्जदारांची उत्पन्नाची मर्यादा लक्षात घेता त्यास अन्य ‘वरच्या’ उत्पन्न गटातील घरे परवडणार कशी, याचा उलगडा गृहनिर्माण विभागाच्या आदेशातून झालेला नाही. त्यामुळे, ही केवळ घोषणा वा दिवास्वप्न ठरू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

म्हाडाच्या मुंबईसह इतर मंडळांकडून घरांची स्वप्ने पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी घरांची सोडत काढली जाते. गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किंमती खासगी गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या जवळपास जात असल्याची टीका केली जात आहे. त्यातच, गृहनिर्माण विभागाने या सोडतीसाठी उत्पन्न मर्यादा, अर्ज दाखल करण्यातील गटांतील अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयात चारही गटांतील वार्षिक उत्पन्न गटात बदल केले आहेत. त्यात, उच्च उत्पन्न गटासाठी कमाल उत्पन्न मर्यादेचे बंधन ठेवण्यात आलेले नाही. त्या गटांसाठी वार्षिक १२ लाख रुपयांहून अधिक उत्पन्नाची पात्रता ठेवण्यात आली आहे.

राज्याच्या गृहनिर्माण विभागाने म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदारास अल्प, मध्यम, उच्च अशा चारही उत्पन्न गटात अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे. अल्प उत्पन्न गटातील अर्जदारास अल्प, मध्यम, उच्च गटात अर्ज भरता येणार आहे. मध्यम उत्पन्न गटातील अर्जदारास मध्यम आणि उच्च गटात अर्ज करता येईल. उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांना त्यांच्याच गटात अर्ज भरता येणार आहे.

म्हाडातील सोडतीमध्ये अत्यल्प गटातील अर्जदारास सर्वच गटांमध्ये अर्ज सादर करण्यास अनुमती देण्यावरुन आश्चर्य व्यक्त केले आहे. तशी अनुमती देताना त्यातील त्रुटींचा अभ्यास केला गेला नाही का, असे मतही व्यक्त केले जात आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीत अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. त्याचवेळी म्हाडाने अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील व्यक्तीचे कौटुंबिक उत्पन्न मर्यादा कमी असतानाही त्यास अन्य गटातील वाढीव घरांच्या क्षेत्रफळाचा लाभ कसा होणार, अशी विचारणा केली जात आहे. त्या सोडतीतील विजयी अर्जदारांना बँकांकडून कोणत्या आधारावर कर्ज दिले जाईल, असाही पेच निर्माण झाला आहे.

उत्पन्न मर्यादेत वाढ

गृहनिर्माण विभागाने म्हाडा सोडतीतील आर्थिक उत्पन्न गटातही बदल केला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक मर्यादा ६ लाख रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक ९ लाख रुपये उत्पन्न, मध्यम उत्पन्न गटासाठी १२ लाख रुपये उत्पन्न निश्चित केले आहे. ही मर्यादा मुंबई, पुणे, नागपूर महानगर क्षेत्र, नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) यासाठी लागू असेल, असे स्पष्ट केले आहे.

चटई क्षेत्रफळ, उत्पन्न गट मर्यादेत बदल

उत्पन्न गट वार्षिक उत्पन्न मर्यादा चटई क्षेत्रफळ (चौ.फू)

अत्यल्प ६ लाख रुपये ३२२ चौ.फूट

अल्प ९ लाख रुपये ६४५ चौ.फूट

मध्यम १२ लाख रुपये १,७२२ चौ.फूट

उच्च मर्यादा नाही २,१५२ चौ.फूटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.