पुणे : माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झालाय. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केलाय. उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रज मधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परत जात होते. नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय सामंतांची गाडी तिथं पोहोचली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीची मागची काच फोडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नाही, असं आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांनी म्हटलंय.

नेमकं काय झालं?

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत हडपसरकडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्याच वेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गाडीला घेराव घातला. गद्दार गद्दार अशा घोषणा देत उदय सामंत त्यांच्या गाडीला घेराव घातल्याने पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंकर मठात जाणार असल्याने असल्याने उदय सामंतांना तिथे पोहोचायचे होते मात्र शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याने त्यांची गाडी वेगळ्या दिशेने वळवण्यात आली. यावेळी पाठीमागून जाऊन काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीची काच फोडल्याची माहिती आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यांची सभा पुण्यातील कात्रज भागात सुरु होती. सभा संपल्यानंतर ते सभास्थळाहून निघाले. त्याचवेळी उदय सामंत यांची गाडी आदित्य जिथून निघाले आहेत, त्याच चौकात आली. यावेळी उपस्थित शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्या गाडीवर दगडफेक, चप्पलफेक केली आणि गद्दार..गद्दार, अशा घोषणा दिल्या.

हल्ल्यानंतर उदय सामंत म्हणाले…..

माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. कारण माझ्यावर चालून आलेल्या लोकांच्या हातात स्टिक होत्या. त्यांची भाषा अतिशय अर्वाच्य होती. संबंधित लोक शिवीगाळ करत होते. काही लोकांच्या लेखी मी गद्दार असेल, मी धोका दिला असेल. पण निषेधाचं हे माध्यम असू शकत नाही. जर कुणाच्या सांगण्यावरुन हा हल्ला झाला असेल तर हा प्रकार गंभीर आहे. माझ्यासोबत गाडीत बसलेल्या एका कार्यकर्त्याला जमावाचा दगड लागला असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन चाललोय. मी पोलिस स्टेशनला जाऊन यासंबंधी तक्रार देणार आहे. मुख्यमंत्र्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी फोन करुन माझी विचारपूस केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना देखील योग्य त्या सूचना दिल्या आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.