मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदासोबतच विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरुन आता रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेवरील (Vidhan Parishad) आमदारकीसाठी आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात चढाओढ रंगण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचं नाव या जागेसाठी चर्चेत आहे.

विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांशिवाय आणखी एक जागा सध्या रिक्त आहे. ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या जागेवर शिंदे गट दावा सांगणार की, ती जागा भाजपच्या पारड्यात पडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडे जागा गेल्यास चढाओढ होण्याची शक्यता आहे.

रामदास कदम विधिमंडळाबाहेर

शिवसेनेत रामदास कदम यांनी पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. ते चार वेळा विधानसभेवर, तर दोन वेळा परिषदेवर आमदार आहेत. गेल्या वेळी तिकीट नाकारल्यानंतर ते काहीसे नाराज होते. अखेर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : मंत्रिमंडळातून वगळण्याची धास्ती? अब्दुल सत्तारांनी दिल्ली गाठली

उद्धव ठाकरेंशी खास कनेक्शन

रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक खास कनेक्शन आहे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो. २७ जुलै. मात्र रामदास भाई उद्धव ठाकरेंपेक्षा सात वर्षांनी मोठे आहेत. १९५३ मध्ये जन्मलेल्या कदमांनी नुकतंच सत्तरीत पदार्पण केलं. तर १९६० मध्ये जन्म झालेल्या ठाकरेंनी वयाची ६२ वर्ष परवा पूर्ण केली. या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तर कदमांना शुभेच्छा देण्यासाठी शिंदेंनी थेट मुंबईतील कांदिवली भागात असलेलं त्यांचं पालखी निवासस्थान गाठलं होतं.

हेही वाचा : एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही, गिरीश महाजनांशी मात्र अमित शाहांच्या चर्चा रंगल्या

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्रिपद आणि विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा दिला होता. फेसबुक लाईव्हद्वारे रात्री साडेनऊ वाजता त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला होता.

… तर पुन्हा वाद होतील

विशेष म्हणजे विधान परिषदेच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्याची वर्णी लागली, आणि त्याला मंत्रिपद देण्यात आले, तर पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये विधान परिषदेच्या चार आमदारांना वजनदार खाती देण्यात आली होती. सुभाष देसाई, डॉ दीपक सावंत, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांना मंत्रिपद दिल्याने विधानसभेतील आमदारांची नाराजी होती.

हेही वाचा : विधानसभेनंतर आता विधानपरिषद आमदारही टार्गेट? शिंदेंनी ठाकरेंचा शिलेदार फोडलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.