सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईतील मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे हे पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. या पाच जणांवर एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन मुंबई’ची जबाबदारी दिली आहे. तर अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या खासदार राहुल शेवाळे यांच्या माध्यमातूनही शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. राज्यात झालेले सत्तांतर आणि विरोधकांवर तपास यंत्रणांची असलेली वक्रदृष्टी यामुळे मुंबईतील शिवसेनेचे ४० ते ४५ नगरसेवक फुटतील, असा अंदाज आहे.
एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंनाही धक्का
उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिंदे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेलाही मोठा धक्का दिला आहे. पनवेल, उरण, खारघरमधील अनेक मनसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मनसेला मोठे खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह ६५ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोमवारी रात्री मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यासह आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. अलीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला होता. परंतु, त्यानंतर काही दिवसांतच या भागात मनसेचा मोठे खिंडार पडले आहे.