मुंबई : चंद्राबाबू नायडू.. आंध्र प्रदेशचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री, दबदबा असा की संसदेत आणि राज्यातही तेवढंच वजन, गुंतवणूकदारांना राज्यात आणण्यासाठी अव्वल नेता, भाजप प्रणित एनडीएतला एकेकाळचा सगळ्यात महत्त्वाचा चेहरा.. अशी कितीही बिरुदं लावावीत ती कमी पडतील.. पण सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यांना मोदीविरोधाचा सूर आळवला आणि सगळं काही बदललं. चंद्राबाबू एनडीएतून बाहेर पडले.. पण त्यानंतरही त्यांचं एवढं राजकीय वजन होतं की त्यांनी २०१९ ला मोदींना हरवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू केले. पण मोदी तर सोडा, स्वतःचं राज्यही ते वाचवू शकले नाहीत. आंध्र प्रदेशात सुपडा साफ झाला, देशाच्याच काय, राज्याच्याही राजकारणात ते दिसेनासे झाले आणि आंध्रात जगन रेड्डी नावाचं नवं वादळ आलं. पण हे चंद्राबाबू का गायब झाले, मोदींना नडल्यामुळे चंद्राबाबूंचं राजकारण भाजपनेच संपवलं का आणि राष्ट्रपती निवडणुकीत चंद्रबाबूंना कसलंच महत्त्व का उरलेलं नाही? याची कारणं इंटरेस्टिंग आहेत.

चंद्रबाबू नायडू भाजपसोबत होते तेव्हा त्यांचे आंध्र प्रदेशात १०२ आमदार होते, मोदींच्या मंत्रिमंडळात स्वतःचे मंत्रीही होते. २०१९ च्या आधी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर चंद्रबाबूंनी तिसऱ्या आघाडीसाठी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. एनडीएतला मित्रपक्ष फुटला हा धक्का भाजपसाठी जिव्हारी लागणारा होता, त्यातच चंद्राबाबू जे करत होते त्याने तेव्हाचे भाजपाध्यक्ष अमित शाह अधिकच खवळणं स्वाभाविक होतं. त्याच वेळी आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी नावाचं वादळ आलं… जगन रेड्डी अल्पावधीतच एवढे लोकप्रिय झाले की त्यांनी १७५ आमदार असलेल्या आंध्र प्रदेश विधानसभेत स्वतःचे १५१ आमदार निवडून आणले.. मुख्यमंत्री असलेल्या चंद्रबाबूंचा अक्षरशः सुपडासाफ केला.. लोकसभेतही चंद्रबाबूंना फक्त तीन खासदार पाठवता आले आणि जगन रेड्डींचे २२ खासदार दिल्लीत गेले..

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे सर्वाधिक काळ म्हणजेच १४ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. पहिल्यांदा म्हणजे १९९५ ला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी एनटी रामा राव या दिग्गजासोबत जाहीर बंड पुकारलं आणि स्वतःचे आमदार घेऊन सरकार स्थापन केलं.. तो किस्साही इंटरेस्टिंग आहे.. रामाराव या माणसाचा आंध्रात असा दरारा होता, ज्याच्याविरोधात बंड सोडा, कुणी विरोधातही बोलण्याची हिंमत करत नव्हतं.. पण हे चंद्राबाबू होते, त्यांनी हवं ते केलंच.. नंतर ते २००४ पर्यंत मुख्यमंत्री राहिले.. २०१४ ला पुन्हा भाजपसोबत मिळून त्यांचं सरकार आलं. केंद्रात आणि राज्यात ते भाजपच्या सोबत होते.. एनडीएमधील मोदींचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ते पुढे आले.. पण काही काळातच त्यांचे मोदींसोबत खटके उडू लागले..

मोदींना नडलेल्या चंद्रबाबूंची आंध्रात अखेर अस्तित्वाचीच लढाई सुरू झाली.. जगन रेड्डींनी त्यांचा सुपडा साफ केल्यानंतर भाजपनेही उरलंसुरलं बळ काढून घेतलं. आंध्र प्रदेशात सध्या चंद्रबाबूंपेक्षा जन सेना पक्षाच्या पवन कल्याण यांच्या मागे जास्त लोक असल्याचं सांगितलं जातं.. जगन रेड्डींना राष्ट्रीय राजकारणात भाजपकडून कायम खुश ठेवलं जात असल्याचं दिसून येतं, तर जगन रेड्डीही भाजपला कधीही दुखावताना दिसत नाहीत. त्यामुळे चंद्रबाबू आता काँग्रेस आणि पवन कल्याण यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरुन त्यांना जगन रेड्डी आणि भाजपचा सामना करणं सोपं होईल.. पण यात त्यांना कितपत यश येईल याबाबत तेलगू राजकारणाचे जाणकार साशंक आहेत.

वेळ कुणासाठीही थांबत नाही आणि प्रत्येकाचा काळ बदलतो असं म्हटलं जातं.. आंध्र प्रदेशात जगन रेड्डींचा काळ आला आणि चंद्राबाबूंची वेळ बदलली.. त्यांची वेळ एवढी बदलली की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीसाठी आता वेळही देत नसल्याचं बोललं जातं.. राष्ट्रपती निवडणुकीत महत्व मिळण्याचा तर प्रश्नच नाही, कारण म्हणावं तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.