मेट्रो ६ मार्गिका १४.७ किमी लांबीची असून १३ उन्नत स्थानके असणार आहेत. या मेट्रो मार्गिकेसाठी सुमारे ६,७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून या मेट्रोमार्गाची उभारणी सुरू आहे. सद्यस्थितीत मेट्रो मार्गिकेची ५९ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत.
मेट्रो ६ मार्गिकेवर कांजुरमार्ग येथील लाल बहादुर शास्त्री मार्ग आणि जेव्हीएलआर जंक्शन येथे कांजुरमार्ग स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू आहे. पवईकडून येणाऱ्या मार्गावर प्रचंड उतार आहे. त्यामुळे या भागात नैसर्गिक अशी ३९ मीटर दरी तयार झाली आहे. मात्र मेट्रो मार्गिकेला असा तीव्र उतार देणे शक्य नसल्याने याठिकाणी सुमारे ३० मीटर उंचीवर स्थानक उभारले जाणार आहे. सद्यस्थितीत या मेट्रो स्थानकाचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे.
या मार्गिकेवर मेट्रो मार्गाची सर्वाधिक उंची २९.६० मीटर असणार आहे. तर सुमारे २५ मीटर उंचीचा सर्वात मोठा खांब उभारला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत साधारणपणे मेट्रो स्थानकाची उंची १६ मीटर आहे. मात्र कांजूरमार्ग येथील विशेष भौगोलिक परिस्थितीमुळे स्थानकाची उंची ३० मीटरपर्यंत जाणार आहे. दरम्यान या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएने जोगेश्वरी भागातील झोपडपट्टी नुकतीच हटविली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार असल्याचे दिसते.