मुंबई : “कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली. आता पुन्हा तोच प्रकार नको म्हणून यावेळी वाढदिनी कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या”, असं कळकळीचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १४ जून रोजी आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी त्यांना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. त्यांना मनापासून शुभेच्छा देतात. मोठ्या थाटात त्यांचा वाढदिवस होतो. पण यंदाच्या वर्षी राज ठाकरे आजारी आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून त्यांची प्रकृती बरी नाहीये. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ती पुढे ढकलण्यात येतीय. तसेच कोरोनाचाही संसर्ग वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नये, जिथे आहात तिथून शुभेच्छा द्यावात, असं आवाहन राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून केलं आहे.
राज ठाकरे यांनी ऑडियो पोस्टमधून काय आवाहन केलंय?

“माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, त्यादिवशी पुण्याला जी सभा झाली आपली… त्या पुण्याच्या सभेत मी आपणाला सर्वांना सांगितलं की माझी शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी रुग्णालयात अॅडमिट झालो, त्यानंतर सगळ्या टेस्ट झाल्या आणि रात्री मला डॉक्टरांनी सांगितलं की कोव्हिडचा डेड सेल आहे. ते काय असतं हे मलाही नाही माहिती आणि कोणालाच नाही माहिती. त्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता परत करायचं, त्यानंतर मी १०-१२ दिवस कोव्हिडच्या नियमांप्रमाणे घरातच क्वॉरंटाईन आहे. त्या सगळ्या दरम्यान १४ तारखेला माझा वाढदिवस आहे. आपण सर्वजण दरवर्षी माझ्या वाढदिवसाला प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे भेटायला येता. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहातो. सर्वांना भेटल्यावर बरंही वाटतं.

पण, यावर्षी मला १४ तारखेला वाढदिवसाला कोणालाही भेटता येणार नाही. याचं कारण म्हणजे त्या गाठीभेटीत परत जर संसर्ग झाला तर त्यातून मला परत जर शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर मी ती किती पुढे ढकलायची यालाही मर्यादा असते. त्यामुळे पुढल्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरलेली आहे, त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करु इच्छित नाही. म्हणून मी १४ तारखेला कुणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल, जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मी आपल्या सर्वांना निश्चित भेटेन. पण, १४ तारखेला कृपया आपण कुणीही घरी येऊ नये, ही विनंती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.