मुंबई: अभिनेते मिलिंद गवळी अर्थात ‘आई कुठे काय करते’मधील (Aai Kuthe Kay Karte) अनिरुद्ध यांच्या भूमिकेचा जरी प्रेक्षक राग-राग करत असले तरी त्यांच्यावर मात्र चाहत्यांचं प्रेमच आहे. अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांच्या भूमिकेबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय मिलिंद यांनीही अनेकदा म्हटले आहे की चाहत्यांना त्यांच्या भूमिकेचा राग येतो हे त्यांच्या कामाचं कौतुकच आहे. दरम्यान चाहत्यांशी अशाप्रकारे सोशल मीडियाद्वारे ते नेहमीच जोडलेले असतात. आतादेखील अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. त्यांच्या या व्हिडिओ पोस्टमध्ये ते काही खास व्यक्तींसह फोटो काढताना दिसत आहेत, गप्पा मारताना दिसत आहे. पण तुम्हाला माहितेय का या गप्पा शब्दांशिवायच आहेत.

हे वाचा-दीपूच्या मंगळसूत्राचं डिझाइन पाहिलं का? चाहत्यांना आठवली ‘वैदेही’; पाहा Photo

आता तुम्ही म्हणाल की शब्दांशिवाय गप्पा कशा? तर मिलिंद गवळी यांची पोस्ट सर्वकाही सांगून जाते. मिलिंद गवळी यांनी ठाण्यातील अशा एका रेस्टॉरंटला भेट दिली ज्याठिकाणी मूकबधिर कर्मचारी काम करतात. त्यांनी ही पोस्ट शेअर करताना भलीमोठं कॅप्शन देत त्यांचा अनुभव शेअर केला आहे.

काय म्हणाले मिलिंद गवळी?

मिलिंग गवळी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ठाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी भेट दिल्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद म्हणतात की, ‘ माइम म्हणजे मुकाभिनय करणारा कलाकार.’आई कुठे काय करते’चा यश म्हणजेच आमचा अभिषेक देशमुख जो वर्षांपूर्वीच त्याची पत्नी कृतिका देव हिच्यासह ठाण्यात शिफ्ट झाला. कांचन आई सोडल्या तर आम्ही सगळेच मुख्य कलाकार ठाण्यात शिफ्ट झालो आहोत. जो काही थोडा वेळ फॅमिलीसाठी मिळतो तो ठाण्यातल्या ठाण्यातच फिरून आम्ही सगळेच घालवतो. तर, काही दिवसांपूर्वी अभिषेक म्हणाला की, तो त्याच्या पत्नीला घेऊन एका वेगळ्याच रेस्टॉरंटमध्ये गेला होता आणि मला म्हणाला- ‘बाबा तुम्हाला तिथे जायला आवडेल तुम्ही नक्की जा’ आणि माझ्या पोरांनी सांगितलेलं सहसा मी टाळत नाही, त्या रेस्टॉरंटचं नाव आहे ‘मदिरा अंड माइम.’

हे वाचा-महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी ४’ चा प्रोमो शेअरच केला नाही

हा अनुभव शेअर करताना मिलिंद पुढे म्हणाले की, ‘आता मदिरेशी माझा काही संबंध नाही, पण Mime शी नक्कीच आहे. खरच किती इंटरेस्टिंग अशी जागा आहे ही. इथे सगळे मूकबधिर काम करतात. मी दिपाबरोबर तिथे गेलो आणि मला खूपच छान वाटलं. तिथे सगळ्यांचे खूप हसतमुख चेहरे होते. काहीही न बोलता गणेश याने मला विचारलं ‘काय हवं आहे आपल्याला खाण्यासाठी?’ मी त्याला म्हटलं ‘मदिरा सोडून काहीही दे’. तेही मी एक अक्षर न बोलता त्याला ते कळलं. तो मनसोक्तं हसला आणि त्याने छान चविष्ट बर्न्ट गार्लिक सूप मला खूप प्रेमाने आणून दिलं. एकमेकांशी न बोलता आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप हसलो. त्या सगळ्यांशी छान मैत्री झाली. फोटो व्हिडिओ काढून झाले, एकदम मज्जा आली.’


यावेळी त्यांनी दादरमधील एक जुनी आठवणही शेअर केली. ते म्हणतात की, ‘खूप वर्षांपूर्वी दादरला संध्याकाळी सहा वाजता पोर्तुगीज चर्चजवळ चार-पाच मूकबधिर मुलं भेटायची. मी क्लास वरून परत येताना दररोज त्यांना पाहायचो. एकदा मी त्यांच्यामध्ये सामील झालो आणि मग आमच्या खूप छान गप्पा व्हायच्या. खूप चेष्टा मस्करी व्हायची, खूप हसायचो आणि ते सगळं एक अक्षरही न बोलता, एक अक्षरही न ऐकता. फक्त साइन लँग्वेजने. मी आजही ते सगळं मिस करतो. या मुलांना परवा या रेस्टॉरंटमध्ये भेटून छान वाटलं. असं वाटलं की ज्यांनी कोणी हे रेस्टॉरंट काढलं त्याला खरंच सलाम. अशा जॉब क्रिएशनची आज गरज आहे . आपल्याकडे मूकबधिर मुलांसाठी खूप कमी नोकरीच्या संधी आहेत. मदिरा अँड माइमच्या सगळ्या स्टाफला खूप खूप शुभेच्छा.’ या पोस्टच्या शेवटी त्यांनी अभिषेक आणि कृतिका यांचे आभारही मानले आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.