वृत्तसंस्था, वॉशिंग्टनः बफेलो, न्यूयॉर्क आणि उवाल्डे (टेक्सास) येथे झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसदेने बुधवारी व्यापक बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांचा या विधेयकाला विरोध असल्याने त्याचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता कठीण आहे.

अमेरिकेत याआधीही सामूहिक गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, आजवर या घटनांनी अमेरिकी संसदेला त्याविरोधात पाऊल उचलण्यास कधीही प्रवृत्त केले नव्हते. परंतु, उवाल्डे येथील शाळेतील १९ मुले आणि दोन शिक्षकांचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे खासदार अशा घटना रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे बोलत आहेत. शिवाय अलीकडे घडलेल्या गोळीबारांच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची गंभीर साक्ष संसदीय समितीने ऐकल्यानंतर खासदारांवरील दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी बंदूक नियंत्रण विधेयक संसदेत २२३ विरुद्ध २०४ मतांनी मंजूर करण्यात आले.

रिपब्लिकन या विरोधी पक्षाच्या खासदारांचा या विधेयकाला विरोध आहे. त्यातच सिनेटने मानसिक आरोग्य कार्यक्रमात सुधारणा करणे, शाळांमधील सुरक्षा मजबूत करणे आणि पार्श्वभूमी तपासणी वाढवणे यावर भर दिला आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्याची शक्यता खूपच कठीण आहे. या विधेयकावर सहमती मिळवण्याचे काम मुख्यत्वे सिनेटमध्ये होत आहे. जिथे या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होण्यासाठी १० रिपब्लिकन खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता आहे.

वाचाः काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात मुस्लिम समुदाय नाराज; समोर आलं महत्त्वाचं कारण

सेमी-ऑटोमॅटिक रायफल खरेदीसाठी वयोमर्यादा वाढवणे आणि १५पेक्षा जास्त गोळ्यांची क्षमता असलेल्या मॅगझिनच्या विक्रीवर बंदी घालण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. उवाल्डे येथील शाळेतील आणि बफेलो येथील सुपरमार्केटमधील गोळीबारांच्या घटनांमधील दोन्ही संशयित १८ वर्षांचे आहेत. शिवाय त्यांनी वापरलेली सेमी-ऑटोमॅटिक रायफल स्वत: खरेदी केली होती. त्यामुळे सेमी-ऑटोमॅटिक रायफल खरेदीसाठी वयोमर्यादा २१ करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकामुळे सत्ताधारी डेमोक्रॅटिक खासदारांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मतदारांसमोर ठोस धोरण मांडण्याची संधी मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.