मुंबई: अभिनयाबरोबरच स्वत: केलेल्या कवितांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi YouTube Channel) सध्या तिच्या युट्यूब चॅनलमुळे चर्चेत आहे. ‘स्पृहा जोशी’ या तिच्या चॅनलवर ती विविध प्रयोग करत असते. नुकतेच तिच्या चॅनलवर १ लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. तिचं कौतुक म्हणून युट्यूबकडून तिला ‘सिल्वर बटन’ देण्यात आलं आहे. अभिनेत्रीने अलीकडेच युट्यूबवर शेअर केलेला वारीचा अनुभव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या यशाबद्दल ती म्हणाली, ‘मला आवडणाऱ्या कविता तसंच किस्से सांगण्यापासून या चॅनलची सुरुवात झाली. पुढे लॉकडाउनमध्ये त्याला नीट स्वरुप देता आलं. करोनाकाळात सर्वत्र नकारात्मक वातावरण होतं म्हणून प्रेक्षकांना मनोरंजनात्मक आशय देण्याच्या दृष्टीनं आम्ही काम सुरू केलं. चॅनलवर कविता किंवा साहित्य याविषयासह खजिना, खादाडी सीरिज, गंमत गाणी, व्लॉग अशा अनेक गोष्टी आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलो. त्यामुळे सर्व स्तरांतून आम्हाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.’


हे वाचा-लग्नानंतरही कधीच आई झाली नाही ही अभिनेत्री, स्वत:च सांगितलं होतं कारण

स्पृहाच्या या यशात तिच्या टीमचा मोठा वाटा असल्याचं ती म्हणते. ‘माझ्या प्रत्येक व्हिडीओमागे माझी टीम काम करत असते. शंतनू बोरकर (दिग्दर्शन), दिवेश बापट (संकलन), राहुल पाडावे (व्हिडिओ शूट), सुमित पाटील (कलादिग्दर्शन) तर रोहित खेडकर (अॅनिमेशन) अशी माझी टीम नेहमी सक्रिय असते. व्हिडीओसाठी संगीतसुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं; ती जबाबदारी शुभंकर शिंबेकरनं पार पाडली. गौरी भिडे, ओंकार पिंपळे, अनिरुद्ध जोशी, क्षितिज कुलकर्णी, अनुराग पाठक, नचिकेत खासनीस, शुभंकर, अंगत, वैभव शेटकर, सुश्रुत कुलकर्णी अशी माझी टीम माझ्याबरोबर असते म्हणून मी हा एवढा टप्पा पूर्ण करू शकले’, असं स्पृहानं सांगितलं.

हे वाचा-हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परबनं केला रिक्षा चालकांबरोबर डान्स, Video पाहाल तर ठेका धराल!

येत्या काळात प्रेक्षकांना आणखी नवनवीन साहित्य, कविता, गोष्टी ऐकवण्यावर स्पृहाच्या चॅनलचा भर असणार आहे. तसंच तिनं आणि टीमनं प्रेक्षकांना काय बघायला, ऐकायला आवडेल याविषयी त्यांच्याकडूनच सल्ले मागितले आहेत. त्यामुळे येत्या दिवसांत प्रेक्षकांना आणखी वैविध्यपूर्ण आशय बघायला मिळेल यात शंका नाही.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.