वृत्तसंस्था, वॉशिंग्टन:‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांनी पृथ्वीवर आणलेल्या चंद्रावरील मातीत शास्त्रज्ञांनी प्रथमच रोपे उगवली आहेत. चंद्रावर किंवा भविष्यातील अंतराळ मोहिमेदरम्यान अन्न आणि ऑक्सिजन तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘अपोलो’ ११, १२ आणि १७व्या मोहिमेदरम्यान चंद्राच्या वेगवेगळ्या भागांतून ही माती आणण्यात आली होती. संशोधकांनी या मातीत बिया लावल्या. त्यांना पाणी, पोषक तत्त्वे आणि प्रकाश दिला व होणाऱ्या बदलाची नोंद केली. अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी अगदी १२ ग्रॅम मातीत हा यशस्वी प्रयोग केला आहे. चंद्रावरील माती ही पृथ्वीवरील मातीपेक्षा वेगळी असल्याने रोपे तिला जैविकदृष्ट्या कसा प्रतिसाद देतात, याचाही अभ्यास त्यांनी यादरम्यान केला. त्यांचा हा शोध ‘कम्युनिकेशन्स बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

मानवाला चंद्रावर पुन्हा पाठवण्याच्या ‘नासा’च्या ‘आर्टेमिस प्रोग्राम’अंतर्गत हे संशोधन करण्यात आले आहे. चंद्रावर जाणाऱ्यांना अंतराळात रोपे कशी वाढवायची हे चांगल्याप्रकारे समजून घेणे आवश्यक आहे, असे यूएफ अन्न आणि कृषी विज्ञान संस्थेतील प्राध्यापक आणि या अभ्यासाच्या लेखकांपैकी एक असलेले रोब फर्ल यांनी सांगितले. भविष्यातील दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी आपण चंद्राचा प्रक्षेपण केंद्र म्हणून वापर करू शकतो. अर्थात, आपण इथल्या मातीचा रोपे वाढवण्यासाठी वापर करू शकतो, असेही फर्ल यांनी नमूद केले.

अशी फुलली ‘चंद्र बाग’

आपली लहान ‘चंद्र बाग’ वाढवण्यासाठी संशोधकांनी सामान्यत: पेशींच्या संवर्धनासाठी वापरल्या जाणाऱ्या अंगठ्याच्या आकाराच्या प्लास्टिक प्लेट्सचा वापर केला. प्रत्येक भांड्यात त्यांनी चंद्रावरील साधारण एक ग्रॅम माती भरली. त्यानंतर पोषक द्रावणाने ती ओलसर केली. मग संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अरेबिडोप्सिस प्रजातीतील वनस्पतीच्या काही बिया त्यात टाकल्या. चंद्रावरील या मातीत लागवड केलेल्या जवळजवळ सर्वच बियांना अंकुर फुटल्याचे त्यांना आढळून आले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.