‘आपण आपणय… दगडू शांताराम परब!’ हा संवाद तुम्हाला आठवत असेल. याच संवादात ‘टाइमपास ३’ या चित्रपटाचा सारांश दडलेला आहे. प्रेमाच्या शोधात असलेला दगडू तुम्ही-आम्ही ‘टाइमपास’ सिनेमात पाहिला होता. ‘अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है… हम काले हुए तो क्या हुआ, दिलवाले है… हम जीएंगे अपनी मर्जी से…और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से,’ असं म्हणणारा दगडू (प्रथमेश परब) पुन्हा आपल्या भेटीला आला आहे, पण यावेळी या दगडाला ‘पालवी’ फुटली आहे. आता ही पालवी (हृता दुर्गुळे) या दगडाला घट्ट पकडून राहते, की नाही हीच या ‘टाइमपास ३’ या चित्रपटाची गोष्ट आहे.

रवी जाधव हा कल्पकतेनं मनोरंजन करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. सादरीकरणाच्या बाबतीत त्याच्याकडे असलेला जाहिरात क्षेत्रातला अनुभव आणि दृष्टी त्याच्या प्रत्येक सिनेमात दिसते. त्यामुळे ‘टीपी ३’ काहीसा रटाळ असला, तरी तो मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो. विशेष म्हणजे, तो आपल्याला हसवतो! म्हणून या नव्या ‘टाइमपास’ला ‘हास्य’रंजन असं म्हणायला हरकत नाही. ऐंशी-नव्वदच्या दशकातली ही ‘लव्हेबल लव्हस्टोरी’ आहे. यात ‘स्टोरी’ काय, असं प्रश्नचिन्ह आहेच; पण मुख्य भूमिकेतले कलाकार, नाचगाणी आणि चकचकीत सादरीकरणामुळे सिनेमा सावरतो. सिनेमाची सुरुवात आणि शेवट वगळल्यास मधला मामला तसा पोकळ आहे. अपेक्षित प्रसंग, घडामोडी, नाट्य त्यात दिसत नाही. गोष्टीला ठेहराव नाही. पसरट पटकथा, त्यातले प्रसंग ताणलेले भासतात. कलाकारांचा अभिनय आणि संवादामुळे सिनेमा तरला आहे. गोष्टीबाबत बोलायचं, तर प्रेमभंग झालेला दगडू तीन वर्षं अभ्यासात ‘गळपटला’ आहे. कसाबसा तो ३६ टक्के मिळवत बारावी पास झाला आहे. कॉलेजमध्ये त्याच्या आयुष्यात पालवी (हृता दुर्गुळे) नावाची ढासू मुलगी येते. ती दगडूसारखी बेधडक आणि बिनधास्त आहे. तिचे वडील वस्तीतले ‘भाई’ दिनकर पाटील (संजय नार्वेकर) आहेत. एकीकडे दगडूच्या आयुष्यात आलेली पालवी ही बिनधास्त मुलगी आहे, तर दगडूमध्ये परिवर्तन झालं आहे. ‘सभ्य’ होण्याकडे त्यानं लक्ष केंद्रित केलं आहे. पालवीलाही असाच प्रियकर हवा आहे. ती आता दगडूच्या प्रेमात पडते. संपूर्ण गोष्ट या दोघांभोवती फिरते. आता दगडू प्राजक्ताला विसरून पालवीच्या प्रेमात पडतो का, पालवीला त्याच्या खऱ्या स्वभावाविषयी समजल्यावर काय होतं, तिचे वडील दगडूला स्वीकारतात, की शाकालसारखं (वैभव मांगले)प्रेमापासून दगडूला दूर करतात, या सगळ्याची उत्तरं सिनेमात मिळतात.

गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शकानं सुरेल आणि रंगीबेरंगी गाण्यांचा वापर केला आहे. ‘साई तुझं लेकरू’, ‘लव्हेबल’, ‘कोल्ड्रिंक’, ‘वाघाची डरकाळी’, ‘नजर काढ देवा’ ही गाणी श्रवणीय आहेत. या गाण्यांमधलं हृता दुर्गुळे, प्रथमेश परब आणि कृतिका गायकवाड यांचं नृत्यसादरीकरण अफलातून आहे. अमितराजचं संगीत आणि क्षितिज पटवर्धनच्या शब्दांनी सिनेमाला रंगत आणली आहे. अभिनयाच्या पातळीवर विशेष दखल घ्यायला हवी ती हृताची. पालवी ही भूमिका तिनं प्रामाणिकपणे निभावली आहे. तिला असलेली व्यक्तिरेखेची जाण यातून दिसते. प्रथमेशनं त्याचं नेहमीचं दगडूपण यावेळीही कायम ठेवलं आहे. संजय नार्वेकर यांनी आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळा ‘भाई’ उत्तम रेखाटला आहे. कोंबडा (ओंकार राऊत), बालभारती (मनमित पेम) यांचं टायमिंग आणि संवाद भरपूर हसवतात.

टाइमपास ३
निर्मिती ः मेघना जाधव, झी स्टुडिओज्

कथा, दिग्दर्शक ः रवी जाधव

पटकथा ः प्रियदर्शन जाधव, रवी जाधव

कलाकार ः प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, संजय नार्वेकर, भाऊ कदम, ओंकार राऊत, मनमित पेम

संगीत ः अमितराज

गीत ः क्षितिज पटवर्धन

दर्जा ः तीन स्टारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.