यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. बाबरी पडली तेव्हा अयोध्येत शिवसैनिक नव्हते, मी तेथे गेलो होतो, असे फडणवीस म्हणतात. अरे त्यावेळी तुमचं वय काय होतं? तेव्हा अयोध्येला शाळेची किंवा कॉलेजची सहल गेली होती का? तुमचं वय काय होतं, तुम्ही बोलताय काय? तुम्ही आमच्यावर शंका घेता मग मी देखील देवेंद्र फडणवीसांना एक सवाल विचारतो, तुम्ही देशासाठी सोडा हिंदुत्वासाठी काय केलं, हे सांगा. भाजपने बाबरी पाडलीच नाही. पण देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याठिकाणी असतात आणि बाबरी मशिदीवर नुसता चढायचा प्रयत्न केला असतात तर तुमच्या वजनानेच बाबरी मशीद खाली आली असती. कारसेवकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय जरी टाकला असता तर बाबरी मशीद खाली आली असती. आता भाजपवाले म्हणतात की, जो पडला होता, तो केवळ बाबरीचा ढाचा होता. मग त्यावेळी भाजपने आम्ही मशीद पाडून मंदिर बांधले, असा गवगवा का गेला, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
अयोध्येत मशीद होती, हे मी मानत नाही. तो ढाचा होता. हिंदू कधी मशीद पाडू शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानाने सांगतो, आम्ही केलंय. तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली त्यावेळी तुम्ही कुठे होता…? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी त्याठिकाणी होता. एवढंच नाही तर राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये घालवले. लाठ्या-काठ्या खाण्याचं काम मी त्या ठिकाणी केले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.