बहिणींनी अंडरकरंट असा दाखवला की सगळे आडवे पडले:लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, अजित पवारांची प्रतिक्रिया

बहिणींनी अंडरकरंट असा दाखवला की सगळे आडवे पडले:लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली, अजित पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे. यानंतर महायुतीमधील नेत्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिळालेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. बहिणींनी अंडरकरंट असा दाखवला की सगळे उताणे पडले, आडवे पडले, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार म्हणाले, कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, घटकपक्षांचे सहकारी राबले. सर्वजण आपली निवडणूक आहे असे समजून कामाला लागले. आमच्या योजनांबाबत टीका टिप्पणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. महाराष्ट्रात अपयश आले होते, ते अपयश आम्ही मान्य केले. त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करताना अनेक योजना मांडल्या, त्या लोकप्रिय झाल्या. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वजण आपापले अंदाज व्यक्त करत होते. बाकीच्यांचे गाड्या फिरवणे, इकडे जाणे तिकडे जाणे सुरु होते. आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढे जाऊ असे वाटत होते. मात्र, कालचे सर्व पाहिल्यावर आम्ही खाली जातो की काय असे वाटत होते. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचे यश मिळवून दिले आहे, असे म्हणत अजित पवारांनी जनतेचे आभार मानले. अजित पवार म्हणाले, आमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे. एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार आलं आहे. मी राजकारणात आल्यापासून 222 आणि तसं 225 महायुतीला जागा मिळाल्या. एवढं कधी पाहिलं नाही. या यशानं हुरळून देखील जाणार नाही. जसे जसे आकडे पाहत होतो, तेव्हा आर्थिक गोष्टी समोर येत होत्या. आर्थिक शिस्त समोर आणू, आम्हाला याचा अनुभव आहे. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहे. त्याचा आधार आहे. विरोधक निवडणूक टीका करतात बॅलट पेपरने निवडणूक घ्यायला पाहिजे होती मग लोकसभा निवडणूक देखील बॅलट पेपरवर घ्यायला हवी होती. झारखंड आमच्या हातून गेले, आम्ही काय म्हणतोय का? असा सवालही यावेळी बोलताना अजित पवार यांनी उपस्थित केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment