मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत काय घडलं याचा मी साक्षीदार आहे. जास्त बोलाल तर मी माझं तोंड उघडेल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी आक्रमक भूमिका घेत धर्मवीरांसोबत काय घडलं याचे साक्षीदार होता तर २५ वर्ष का गप्प बसला?, असा खडा सवाल एकनाथ शिंदे यांना विचारलाय.

“धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. याविषयी मी आज काही बोलणार नाही. पण जेव्हा समोरुन तोंड उघडलं जाईल, तसं मला देखील त्या गोष्टींवर बोलावं लागेल”, असा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाशिकच्या मालेगावमध्ये बोलताना दिला. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यानंतर आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झालीये. दुसरीकडे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी माझं तोंड उघडेल : एकनाथ शिंदे
“एकनाथ शिंदे जर धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा साक्षीदार आहेत. तर मग इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे, असा टीकास्त्र सोडत सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?”, असा सवाल केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारलाय.

शिवसेनेचं सर्वांत मोठं ‘ठाणं’ असलेल्या ठाण्यातूनच शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सर्वांत मोठं आव्हान उभं राहिलं. महाराष्ट्राच्या सगळ्या विभागातून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. दुसरीकडे एकनाथ शिंदे ज्या धर्मवीर आनंद दिघे यांचं उठता-बसता नाव घेतात त्यांचेच पुतणे केदार दिघे मात्र सेनेच्या पडझडीच्या काळात उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. एकनाथ शिंदे जेव्हाजेव्हा मातोश्रीवर-उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, आनंद दिघे यांच्या अनुषंगाने बोलत आहेत, त्यावेळी प्रत्युत्तर द्यायला केदार दिघे सर्वांत आधी पुढे येत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना काय इशारा दिला?

आनंद दिघे यांनी त्यांचं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतलं. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केलं. पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झालं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडलं, त्याचा मी साक्षीदार आहे. त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. मी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही. पण समोरुन जर तोंड उघडलं गेलं तर मी पण शांत बसणार नाही, असा इशारा देतानाच ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बंड करुन पेठून उठा हीच त्यांची शिकवण’ असल्याचं एकनाथ शिंदे सांगायला विसरले नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.