इगतपुरी तालुक्यातील घटना; संशयितास अटक

म. टा. वृत्तसेवा, घोटीः
पहिल्या दोन बायका, दोन्हीही सख्ख्या बहिणी. त्यात मेहुणीशीही अनैतिक संबंध. तिनेही लग्नासाठी तगादा लावला. हातावरचा कारभार, त्यात आधीच्या दोन बायका, मुले असा मोठा प्रपंच असल्याने घरात तिसरी पत्नी नको म्हणून बहिणीच्या पतीने म्हणजे दाजीने मेहुणीला विवाहास नकार दिला. या रागातून मेहुणीने दाजींचे झोपडीवजा घरच पेटवून दिले. या रागातून दाजीने कोयत्याने वार करीत मेहुणीची हत्या केली. अधरवड, ताराची वाडी (ता. इगतपुरी) येथे ही घटना घडली.

लक्ष्मी संजय पवार (वय २४, रा. बिरुळे, ता. नांदगाव) असे घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अधरवड, ताराची वाडी येथे शनिवारी (दि. ११) पहाटे सुमारे साडेचार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शरद महादू वाघ असे त्याचे नाव आहे.

ऊसतोड कामगार असलेला शरद हा ताराची वाडी येथे काही महिन्यांपासून त्याच्या दोन पत्नींसोबत राहत आहे. दरम्यान, ऊसतोडणीच्या कामासाठी आलेली शरदची मेहुणी लक्ष्मी ही देखील त्याच्यासोबत राहत होती. त्यांचे अनैतिक संबंध जुळले. यातून तिने शरदकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, शरदने नकार दिला. यामुळे संतापलेल्या लक्ष्मीने ‘लग्न कर नाही तर मी तुझे घर जाळून टाकेन,’ अशी धमकी दिली होती. ती धमकी खरी करीत तिने शरदचे झोपडीवजा घर पेटवून दिले. या आगीत शेजारील अन्य दोन-तीन घरेदेखील जळून खाक झाली. यामुळे संतापलेल्या शरदने घरात असलेल्या कोयत्याने लक्ष्मीच्या मानेवर प्रहार केला. वर्मी घाव लागल्याने ती जागीच गतप्राण झाली.

..

…म्हणून विवाहास नकार

शरदला मीना व सावित्री अशा दोन पत्नी आहेत. विशेष म्हणजे त्या दोघी सख्या बहिणी आहेत. त्यात तिसरी बहीण लक्ष्मीही शरदसोबत राहत होती. तिच्याशी त्याचे अनैतिक संबंध होते. लक्ष्मी हीदेखील विवाहित असून, तिचे गेल्या दोन वर्षांत दोन विवाह झालेले आहेत. हातावरचा कारभार, त्यात आधीच्या दोन बायका, मुले असा मोठा प्रपंच असल्याने घरात तिसरी पत्नी नको म्हणून शरदने लक्ष्मीला विवाहास नकार दिला होता.

बनाव उघड

सुरुवातीला शरदने जमिनीच्या वादातून अज्ञातांनी आपले घर जाळले, मेहुणीची हत्या केली, असा बनाव केला होता. मात्र, सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलिसी खाक्या दाखवताच शरदने गुन्ह्याची कबुली दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.