केरळः मंकीपॉक्सचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात मंकीपॉक्समुळं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमिरातीहून (UAE) केरळमध्ये परतलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णामध्ये मंकीपॉक्स विषाणू सदृश्य लक्षणं आढळली होती. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोग्य विभाग अधिक तपासणी करत आहे. (Monkeypox Death)

शनिवारी २२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून संयुक्त अरब अमिरातीमध्ये असतानाच त्याला मंकीपॉक्सची लागण झाली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांने त्रिशूरमध्ये उपचार घेण्याची मागणी केली होती, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. दरम्यान, मंकीपॉक्ससदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णाच्या मृत्यूची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रुग्णावर उपचार करण्यास विलंब का झाला, याचीही चौकशी करण्यात येणार आहे. युवकाच्या मृत्यूप्रकरणी आरोग्यविभागाने तातडीने एक बैठक आयोजित केली होती. यावेळी तरुणाच्या संपर्क सूची आणि रूट मॅप तयार करण्यात आला.

वाचाः जगभर धुमाकूळ घालणारा मंकीपॉक्स व्हायरस भारतात; लागण कशी होते, समलैंगिकांना अधिक धोका?

२१ जुलैला आला होता भारतात

आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षांचा हा तरुण २१ जुलै रोजी भारतात आला होता. युएई सोडण्याच्या एक दिवस आधी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २७ जुलै रोजी तो रुग्णालयात दाखल झाला होता. दरम्यान, पुन्हा एकदा रुग्णाच्या नमुन्याची चाचणी करण्यात येणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये मंकीपॉक्समुळे आरोग्य आणीबाणी

न्यूयॉर्क शहरात मंकीपॉक्समुळे आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. सद्यस्थितीत न्यूयॉर्क शहर या साथीचा केंद्रबिंदू जाहीर करण्यात आला असून शहरातील सुमारे दीड लाख नागरिक बाधित होण्याची भीती व्यक्त होत आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर आणि शहराच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी शनिवारी या आरोग्य आणिबाणीची घोषणा केली. गेल्या काही आठवड्यांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी संसर्ग आटोक्यात आणण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले. लसपुरवठा, उपचाराच्या सुविधा दिल्या. मात्र सद्यस्थितीत न्यूयॉर्क शहर या आजाराचा केंद्रबिंदू आहे. सुमारे दीड लाख शहरवासीयांना मंकीपॉक्स होण्याचा धोका आहे. त्यामुळे जसजसा लससाठा उपलब्ध होईल, त्यादृष्टीने लसपुरवठा करण्याचा प्रयत्न सरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ही आरोग्य आणिबाणी जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शक्य तितक्या लवकर अतिरिक्त लशीच्या मात्रा मिळाव्यात, यासाठी सरकारस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

वाचाः महागाई नेमकी कशामुळे? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.