म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः नॅशनल हेरॉल्डच्या कथित मनीलाँड्रिंग प्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील आयटीओ येथील हेरॉल्ड हाऊस तसेच मुंबई आणि कोलकातासह १६ ठिकाणी छापे टाकले. ‘सर्वसामान्य जनतेचे महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवरून लक्ष उडविण्यासाठी मोदी सरकारने राजकीय सुडाने प्रेरित होऊन ही कारवाई केली आहे’, असा आरोप काँग्रेसने केला.

हेरॉल्ड हाऊसच्या कार्यालयावर ईडीच्या पाच अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी छापा टाकला. यावेळी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आले आणि आत उपस्थित असलेल्यांचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन या कारवाईचा विरोध केला आणि मोदी सरकारविरोधात घोषणा देत निषेध केला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी २१, २६ आणि २७ जुलै रोजी ईडीच्या मुख्यालयात १२ तास चौकशीला सामोरे गेल्या होत्या. तर राहुल गांधी यांची १३ ते १५ तसेच २० आणि २१ जून अशी पाच दिवस आणि पन्नास तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती.

काँग्रेसने या कारवाईचा संबंध सर्वसामान्यांना झळ पोहोचविणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीशी जोडला. ‘सरकारच्या प्रत्येक चुकीच्या धोरणाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव पडत असून, त्यासाठी आपण व काँग्रेस पक्ष पुढेही लढत राहू. कुठलाही प्रश्न न विचारता हुकूमशहाची प्रत्येक गोष्ट स्वीकारली जावी, असे या सरकारला वाटते. पण त्यांना घाबरण्याची किंवा त्यांची हुकूमशाही सहन करण्याची गरज नाही. ते भित्रे आहेत. जनतेची ताकद आणि ऐक्याला ते घाबरतात. त्यामुळेच ते सतत ऐक्यावर हल्ले करीत आहेत. जनतेने एकजूट होऊन त्यांचा सामना केला, तर ते घाबरतील. आम्ही घाबरणार नाही आणि जनेतालाही भीती घालू देणार नाही’, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले.

‘मोदी सरकारने राजकीय सुडाच्या भावनेने ग्रासून ही कारवाई केली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘नॅशनल हेरॉल्ड’वर इंग्रज धाडी घालायचे. आता मोदी सरकार घालत आहे. असह्य महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून लक्ष उडविण्यासाठीच केलेली ही कारवाई आहे. यंग इंडिया आणि एजेएल या दोन्ही कंपन्यांमधून कायद्याने कुठलाही लाभ घेता येत नसून, त्याच्याशी संबंधित सर्व दस्तावेज सरकारी वेबसाइटवर उपलब्ध आहेत. या प्रकरणी कोणतेही पुरावे नाहीत. पण प्रक्रियेत अडकवून शिक्षा देण्याचा प्रकार सुरू आहे’, असे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणीही छापे

कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कोलकात्यात छापे टाकले. सध्या अटकेत असलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्याशी संबंधित दोन घरे व एका दुकानाची ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.