मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडले आणि महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. भाजपने सहापैकी तीन जागा जिंकून विजयाचा गुलाल उधळला. त्यामुळे शिवसेना उमेदवार संजय पवार पराभूत झाले. हा पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला असून शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत ‘वर्षा’ निवासस्थानी तातडीने महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर ते थेट वर्षावर रवाना झाले. या ठिकाणी उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब यासारख्या शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु झाली आहे. शिवसेना उमेदवाराचा पराभव, राज्यसभा निवडणुकीत नेमकं काय चुकलं, या विषयांवर बैठकीत काथ्याकूट होण्याची चिन्हं आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी चुरस दिसून आली. पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपने शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्ष खेळी करत महाडिक यांना निवडून आणले आणि मोठा राजकीय भूकंप घडवला. या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीची मते फुटल्याची चर्चा सुरू आहे.

संजय राऊतांचे थेट आरोप

राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता ते पाळले गेले असते तर शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव झाला नसता. विशेषत: वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीची सगळी मतं जशीच्या तशी आम्हाला मिळाली आहेत. फक्त घोडेबाजारातील सहा-सात मतं न मिळाल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, असेही संजय राऊत सकाळी म्हणाले होते.

‘भाजपचा विजय दैदिप्यमान वगैरे नाही’

आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असे होत नाही. संजय पवार यांना पहिल्या फेरीत ३३ मते मिळाली होती. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत २७ मते मिळाली होती. हादेखील संजय पवारांचा विजयच आहे. पण शेवटी राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया अशी आहे की, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिक विजयी ठरले. घोडेबाजारातील काही घोडे जास्त किंमतीला विकले गेल्याने संजय पवार यांचा पराभव झाला, असे राऊत यांनी सांगितले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.