मुंबई: बॉक्सऑफिसवर गाजणाऱ्या सिनेमांचा समाजातील अनेक ठिकाणी प्रभाव असतो हे आपण नेहमीच पाहतो. पण सिनेमातील दृश्यांचा चुकीच्या प्रकारे वापर केला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे पाकिस्तानातील एका हॉटेलबाहेर दिसून आलं. गंगूबाई काठियावाडी या सिनेमात आलिया भट्टने एका देहविक्री करणाऱ्या स्त्रीची भूमिका केली आहे.गंगूबाई काठियावाडी या महिलेच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.

आलियाने केलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. रेडलाइटमध्ये राहणाऱ्या आणि पोटासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांचं आयुष्य कसं असतं हे या सिनेमातून मांडलं आहे. आलिया भट्ट च्या फिल्मी करियरमधील एक महत्वाचा सिनेमा म्हणून या कलाकृतीची चर्चा झाली. पण सध्या या सिनेमातील एका दृश्याचा पाकिस्तानी हॉटेलमध्ये गैरवापर केल्याने आलियाचे चाहते आणि भारतीय सिनेमा रसिकांनी त्या हॉटेलचालकाला धारेवर धरलं आहे.

पाकिस्तानातील स्वींग खी या हॉटेलबाहेर आलिया भट्ट हिचा गंगूबाई सिनेमातील रेडलाइट एरियामध्ये उभी राहून ग्राहकांना खाणाखुणा करून बोलवत असल्याचा व्हिडिओ लावण्यात आला आहे. सिनेमातील या सीनमध्ये गंगूबाई जेव्हा पहिल्यांदा वेश्या व्यवसाय करण्यासाठी उभी राहते तेव्हा तिला ग्राहकांना कसं बोलवायचं असतं हे शिकवण्यात आले तो हा सीन आहे. खरं तर सिनेमात हा सीन खूप भावुक आहे. पण त्याच सीनचा हॉटेलच्या मार्केटिंगसाठी बाजार मांडल्याने नेटकरी खवळले आहेत.


हा व्हिडिओ हॉटेलच्या इन्स्टापेजवरही शेअर केला आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, आजा ना राजा, किसका इंतजार कर रहे हो? आओ और सोमवार को २५ टक्के ऑफर ले जाओ. पाकिस्तानातील हॉटेल चालकांनी त्यांच्या मार्केटिंगसाठी वापरलेले गंगुबाई सिनेमातील या दृश्याचा गैरवापर केल्याचा आरोप भारतीय सिनेरसिकांनी केला आहे. जाहिरातीसाठी वेश्या महिलेच्या आयुष्यातील हा भावुक सीन वापरणं चुकीचं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली, मात्र ही एक जाहिरात संकल्पना असून कुणाला दुखवण्याचा हेतू नसल्याचं हॉटेल व्यवस्थापनाने म्हटलं आहे. सिनेमात केलं तर आग आणि आम्ही दाखवलं तर पाप असं म्हणत पाकिस्तानी हॉटेलनं व्हिडिओ हटवण्यास नकार दिला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.