मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठी जी निवडणूक पार पडली त्यात भाजपची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली. निवडणुकीसाठी झालेलं मतदान, त्यानंतर शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या मतांवर घेतलेला आक्षेप आणि मध्यरात्री रंगलेला सर्व हायव्होलटेज ड्रामा, त्यानंतरही जे निकाल हाती आलेत त्यामध्ये भाजपने शिवसेनेला बोल्ड करत धनंजय महाडिकांच्या पारड्यात विजय आणून टाकण्यात यश मिळवलं. यासर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत अपक्षांना आपल्या बाजूने करण्यात देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न यशस्वी झाले असून निकालाने मला धक्का बसलेला नाही, असं ते म्हणाले.

फार धक्का बसेल अशा मताचा हा निकाल नाही – शरद पवार

“मला स्वत:ला फार धक्का बसेल अशा मताचा हा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा उमेदवारांचा जो कोटा दिला त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडलं आहे ते आणि कुठनं आलंय हे मला ठावुक आहे. ते या आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूचं आहे. हा भाग सोडा”.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार केला, त्यांना माणसं आपलीशी करण्यात यश, शरद पवारांकडून कौतुक

सहाव्या जागेसाठी धाडस केलं आणि प्रयत्न केला – शरद पवार

“आता सहावी जागा जी शिवसेनेने लढवली तिथे आमची गॅप पडत होती. मतांची संख्या कमी होती. पण, धाडस केलं आणि प्रयत्न केला, त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आणि आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ही जी आघाडी आहे, त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे. त्यात वेगळं काही नाही”.

“जो चमत्कार झालेला आहे, तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्यात त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. ही सगळी संख्या बघितली तर सरकारला सरकार चालवायला जे बहुमत हवंय त्यात काहीही धक्का लागलेला नाहीये. मला काही कमी पडलेलं दिसत नाही. एक-दोन मतं इकडे तिकडे जादा घेतली, पण तरीही दोन नंबरची सीट त्यांना मिळाली”.

हेही वाचा-भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादीला मिळालंय, शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

भाजपच्या गटातलं एक मत राष्ट्रवादीला – शरद पवार

“राष्ट्रवादी, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसलेला नाही. आता राहिला अपक्षांचा भाग तर यात थोड्या गमती झालेल्या आहेत”. राष्ट्रवादीला सुरक्षित करण्यासाठी जादा मत प्रफुल्ल पटेलांना आलं. तर ते शिवसेनेच्या उमेदवाराला गेलं असतं तर विजयाची संधी असती का? यावर शरद पवार म्हणाले – “गंमत अशी आहे की ते जादाचं मत शिवसेनेला जाणारच नव्हते. ते जादा मत आमच्या विरोधकांच्या गटातलं होतं. जे राष्ट्रवादीला आलं आणि त्यांनी मला सागून दिलं. तिथे अनेक असे लोक आहेत ज्यांनी कधीकाळी त्यांनी माझ्याबरोबर काम केलंय. मी जर एखादा शब्द टाकला तर नाही म्हणायची त्यांची तयारी नसते. पण, मी त्यात पडलो नाही. पण, एकाने स्वत:हून मला सांगितलं. हे मत भाजपचं नाही तर अपक्षाचं होतं पण ते भाजपच्या गटातलं होतं”, असं म्हणत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

तो रडीचा खेळ -शरद पवार

“रात्री काय तो उशिर झाला त्याच्यासाठी जी हरकत घेतली गेली तो रडीचा खेळ होता. राज्यसभेच्या निवडणुकीचा नियम असा आहे, की मतदाराने पक्षाच्या नेतृत्त्वाला ते मत दाखवायचं असतं. मत दाखवायचा अधिकार आहे. त्यामुळे जर कोणी नाना पटोले किंवा जयंत पाटलांना मत दाखवलं तर यात बेकायदेशीर काही नाही. तो निकाल निवडणूक आय़ोगाने दिला. पण, त्यासाठी एक ४ तास उशिर झाला”, असंही ते म्हणाले. “शिवसेनेच्या आमदाराचं मत का बाद झालं मला माहित नाही. त्यांनी काय केलं मला माहित नाही, पण इतर तिघांसंबंधी जो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे तो योग्य आहे”, असं शरद पवारांनी सांगितलं.
सहाव्या जागेवर पराभूत, शिवसेनेची शोभा झाली, मनसेने एकच ट्विट केलं पण जखमेवर मीठ चोळणारं!
हेही वाचा-

उद्धव ठाकरेंनी रिस्क घेतली – शरद पवार

“राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, जी उद्धव ठाकरेंनी घेतली. अतिशय कमी मतं असताना त्यांनी ही जागा लढवली आणि ती जवळपास ३३ पर्यंत आणली”, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

“राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सोनिया गांधी एकत्र बसणार आहोत. यावर अद्याप काही चर्चा केली नाही. एकत्र बसून चर्चा करावी ही इच्छा सगळ्यांची आहे. ती प्रिक्रिया आम्ही सुरु करतोय”, अशीही माहिती त्यांनी दिली.

निकालाने मला धक्का बसलेला नाही; राज्यसभा निकालावर शरद पवारांची प्रतिक्रियाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.