सिनेमांची मूळ गोष्ट हिरा (आरोह वेलणकर) आणि त्याच्या मित्रांची आहे. सूर्या (हर्षद शिंदे), विनोद (पार्थ घाटगे), सदा (सिद्धेश पुजारे) आणि हिरा… हे चाळीतील चार तरुण. कामाधंद्याच्या शोधात असलेली ही मुलं स्थानिक राजकारणात काहीसे सक्रिय असतात. सक्रिय असले तरी एक रुपयाची कमाई नसते. पण, मुलं महत्त्वाकांक्षी असतात. काही कारणास्तव त्याच्याकडे एक महिला तिच्या वडिलांच्या अंतिमसंस्काराच्या कार्यासाठी मदत मागते. ही मदत आर्थिक नसते. अंतिम संस्कार करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची जुळवाजुळव कोणीतरी करुन द्यावी; यासाठी ती महिला या मुलांकडे मदतीचा हात मागते. मुलंदेखील माणुसकीच्या नात्यानं त्या महिलेला कोणत्याही परतफेडीच्या भावनांविना मदत करतात. परंतु, ती महिला या मदतीच्या बदल्यात काही रुपये देते. सुरुवातीला हे पैसे घेण्यास हिरा नकार देतो. पण, आग्रहामुळे मुलं ते पैसे स्वतःकडे ठेवतात. याच वळणावर त्यांना एक युक्ती सुचते आणि हाच ‘अंतिम संस्कार व्यवस्थापने’चा व्यवसाय आपण करावा; यासाठी त्यांची धडपड सुरू होते.
त्यांच्या या अनोख्या व्यवसायाच्या मार्गावर अडचणी आल्याशिवाय कथानक पूर्ण कसं होईल! परिणामी हिराचा आजोबा (विजय केंकरे) आणि चाळीतील इतर चाळकरी मंडळी या मुलांना हा व्यवसाय करण्यावर मज्जाव आणतात. पैसे घेऊन अंतिम संस्कार करणार का? असा सवाल चाळकरी या मुलांना विचारतात. आजच्या तारेखला ‘अंतिम संस्कार व्यवस्थापना’चे काम करणाऱ्या संस्था आहेत. हाच वर्तमानातील गरजेचा धागा सिनेमात दिसतो. हिराच्या अनोख्या धंद्याचं पुढं काय होतं? चाळकरी त्याला मान्यता देतात का? समाज याकडे कोणत्या दृष्टीनं बघतो? हा व्यवसाय करुन हिराला केवळ आर्थिक फायदा लाभतो की मनशांतीही मिळते? आदी सर्वांची समर्पक उत्तरं तुम्हाला सिनेमात मिळतील.
सिनेमाचे संवाद आणि पटकथा ही सिनेमाची बलस्थानं आहेत. प्रत्येक पात्रातील वेगळेपण दिग्दर्शकानं अधोरेखित केलं आहे. मग हे चार मित्र असतो, हिराचे आजोबा, चाळीतील मोरे आजी (प्रेमा साखरदांडे), रुग्णालयातील कर्मचारी कचरू (संभाजी भगत) आणि हिराची मैत्रीण मीनल (तन्वी बर्वे) या सर्व व्यक्तिरेखा सिनेमा संपल्यावरही ठळकपणे आपल्या स्मरणात राहतात. सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. आरोह वेलणकर हा ताकदीचा अभिनेता आहे. त्या म्हणाव्या तशा संधी मिळालेल्या नाहीत. परंतु, या सिनेमातील त्याचं काम पाहून नक्कीच दिग्दर्शक अधिकाधिक चांगल्या भूमिकांसाठी आरोहचा विचार करतील. सिनेमातील ‘कावळा’ खूप महत्त्वाचा आहे. हिरा कावळ्यासोबत अनेकदा बोलत असतो… त्याचे प्रसंग बारकाईनं बघा. गंमत आहे त्यात. बाकी एकंदर सिनेमा टापटीप आणि आवश्यक तितकाच लांबलेला आहे. अतिरंजितपणा सिनेमात नाही. अवाजवी गाणी नाहीत. त्यामुळे सिनेमा प्रभावी आणि परिणामकारक ठरतो. आजच्या नजीकच्या महिन्यांमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या पठडीतील, प्रवाहातील हा सिनेमा नाही. परंतु, या प्रवाहात चालताना प्रेक्षकांना विसावा देणारा हा सिनेमा आहे. हा विसावा नक्कीच घ्यायला आणि मृत्यूकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपण आत्मसात करायला हवा.
सिनेमा : फनरल
निर्माते, लेखक : रमेश दिघे
दिग्दर्शक : विवेक दुबे
कलाकार : आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत
संकलन : निलेश गावंड
छायांकन : अनुराग सोळंकी
दर्जा : तीन स्टार