म. टा. प्रतिनिधी, पुणे ः बिष्णोई टोळीचा विस्तार देशातील सहा-सात राज्यांत असून, विविध गुन्ह्यात फरारी आरोपींना आश्रय व आर्थिक मदत देऊन, त्यांचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी करायचा, अशी या टोळीची कार्यपद्धती आहे. या टोळीचे म्होरके समाजमाध्यमातून ‘रील्स’द्वारे शस्त्रांचा वापर व हिंसेचे उदात्तीकरण करत असून, त्याकडे अनेक तरुण आकर्षित होत आहेत. या टोळीची महाराष्ट्रातील पाळेमुळे खणून काढतानाच, त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांची यादी करून त्यांचे समुपदेशन करण्यावर पुणे ग्रामीण पोलिस भर देत आहेत.

‘बिष्णोई टोळी ही ‘पॅन इंडिया गँग’ आहे. तिचे प्रमुख म्होरके तुरुंगात किंवा भारताबाहेर आहेत. विविध गुन्ह्यांत फरारी झालेल्या आरोपींशी ते समाजमाध्यमातून संपर्क साधतात. त्यांना आर्थिक मदत देऊन लपून राहण्यासाठी मदत करतात. अत्यंत किरकोळ मोबदल्यात या आरोपींना गंभीर गुन्हे करण्यासाठी वापरले जाते. बिष्णोई टोळीतील म्होरके छायाचित्रे, व्हिडिओ समाजमाध्यमात टाकून शस्त्रवापर, हिंसेचे उदात्तीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. गुन्हेगारी प्रवृत्तीची नसलेली मुलेही त्याकडे आकर्षित होतात. हा ‘ट्रेंड’ समाजघातक असून, या समाजमाध्यम खात्यांच्या आकर्षणाला बळी पडलेल्या तरुणांची यादी तयार केली जात आहे. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या तरुणांचे समुपदेशन करण्यात येणार आहे,’ असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

करण जोहरलाही महाकाळ देणार होता धमकी?

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरला धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी सौरभ महाकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे मागणार होता, असे पोलिस चौकशीत समोर आले आहे. त्याबाबत विचारणा केली असता, ‘अभिनेता सलमान खान आणि करण जोहर यांना धमकीबाबत आरोपींनी केलेल्या दाव्यांची पोलिस खातरजमा करीत आहेत,’ असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. ‘मुसेवाला हत्या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिष्णोईने पोलिस चौकशीत संतोष जाधवचे बिष्णोई टोळीशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. संतोष जाधव बिष्णोईच्या पंजाबमधील गावात राहिला होता. मात्र, मुसेवालावर त्याने प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही,’ असेही त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.