सतेज पाटील ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जिथे शक्य होईल तिथे आघाडी करून, तर जेथे शक्य नाही तिथे स्वतंत्र लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येणाऱ्या निवडणुकीत सत्ता बदलाचा परीणाम होणार नाही. जर निवडणूक आयोगाकडून मतदारांचे मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याचे काम या महिन्याभरात पूर्ण झाले, तर निवडणुका सप्टेंबरपर्यंत होतील असा अंदाज ही त्यांनी वर्तवला आहे.
भाजप आणि शिंदे गट एकत्र येत स्थापन केलेल्या नव्या सरकारला आता तब्बल एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकला नाही. यावरूनच आता विरोधी पक्ष या नव्या सरकारवर टीका करू लागला आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, सरकार स्थापन होऊन एक महिना झाला तरीही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. म्हणजे भाजप आणि शिंदे दोन्ही गटाकडून कुठे तरी घोडे अडले असावेत. मंत्रिपदाला इच्छुकांची संख्या वाढल्याने विलंब होत असावा. आता मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावे लागतील असा टोलाही त्यांनी नव्या सरकारला लगावला आहे तसेच राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच प्रशासकीय बदल्या अडकले आहेत. यामुळे किमान दोन्ही गटाचे चार पाच मंत्री तरी करा, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.