बर्मिंगहम : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने आज इतिहास रचला. कारण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकवून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.

अविनाशची ३००० मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. शर्यतीच्या अंतिम फेरीत केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशने ८:११.२० सेकंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. भारत आणि केनिया यांच्यामध्ये यावेळी कडवी झुंज पाहायला मिळाली, चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. त्यावेळी अविनाश रौप्यपदक पटकावेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. आतापर्यंत एकाही भारतीयाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये पदक जिंकता आले नव्हते. पण अविनाशने यावेळी कमालच केली. ही शर्यत पाहताना अविनाश पदक जिंकेल, असे कोणला वाटले नव्हते. पण अविनाशने यावेळी विचारपूर्वक कामगिरी केली. कोणत्या क्षणी काय करायचे हे त्याने ठरवले होते. त्यामुळेच त्याला रौप्यपदक पटकावता आले आहे. भारताचे हे स्टीपलचेसमधील पहिलेच पदक आहे.

भारताच्या प्रियांका गोस्वामीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने ४३ मिनिट ३८.८३ सेकंदाची वेळ नोंदवताना हे पदक जिंकले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. या क्रीडा प्रकारात भारताचे हे राष्ट्रकुल स्पर्धा इतिहासातील पहिलेच पदक आहे.
उत्तर प्रदेशच्या २६ वर्षीय प्रियांकाने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत ती १७वी आली होती. अॅथलेटिक्समध्ये येण्यापूर्वी प्रियांका जिम्नॅस्टीक्स करायची. तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यास सुरुवात केली, कारण यामध्ये जिंकणाऱ्याला बक्षीस म्हणून बॅग दिल्या जायच्या. फेब्रुवारी २०२१मध्ये तिने भारतीय रेसवॉकिंग अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि १:२८.४५ असा राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि २०२०च्या ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.