वृत्तसंस्था, नवी दिल्लीः पश्चिम बंगालमधील हावडा येथे तीन आमदारांना मोठ्या रकमेसह पकडण्यात आल्यानंतर झारखंडमधील युतीचे सरकार पाडण्याचे भाजपचे षड्‌‌यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. त्यांनी महाराष्ट्रात जे केले त्याचीच पुनरावृत्ती झारखंडमध्ये करण्याची या पक्षाची योजना असून, प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपयांची ऑफर देण्यात य़ेत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, रोख रक्कम सापडलेल्या आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे; तसेच त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपने मात्र काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग-१६वर काँग्रेसचे झारखंडमधील आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छप आणि नमन बिक्सल कोंगरी याची कार शनिवारी अडवली होती. या गाडीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली होती. यावर राज्यातील स्थिर सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. ‘भाजपचे ऑपरेशन लोटस आज रात्री हावडा येथे उघड झाले. महाराष्ट्रात जे केले, तेच झारखंडमध्येही करण्याची दिल्लीतील ‘हम दो’ यांची योजना आहे,’ असे ट्वीट काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी शनिवारी केले होते.

महाराष्ट्रात पक्षातून बंड करून, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसने भाजपवर अनैतिकपणे सत्ता बळकावल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर आमदारांकडे आढळलेली रक्कम हा लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबतचे राज्यातील हेमंत सोरेन सरकार पाडण्याच्या भाजपच्या कटाचाच भाग असल्याचा दावा झारखंड काँग्रेसने केला आहे.

काळ्या एसयूपीव्हीमध्ये कोट्यवधींची रोकड

काळ्या रंगाच्या कारमधून मोठ्या प्रमाणात पैशांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वाहनांची तपासणी सुरू असताना अशाच रंगाची एसयूव्ही अडवण्यात आली. यात झारखंडचे हे तीन काँग्रेस आमदार प्रवास करीत होते. हावडामधील रानीहाटी येथील या कारवाईत त्यांच्या गाडीत शनिवारी मोठ्या प्रमाणात रोकड सापडली होती. हे पैसे मोजण्यासाठी मशिन आणण्यात आल्या आहेत; तसेच एवढे पैसे कुठून आले व ते कुठे नेले जात होते, याबाबत आमदारांची चौकशी केली जात असल्याचे हावडाच्या पोलिस अधीक्षक (ग्रामीण) स्वाती भंगालिया यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सीआयडीने या प्रकरणाचा तपास हावडा ग्रामीण पोलिसांकडून आपल्याकडे घेतला आहे.

‘झारखंडमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला’

भाजपने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘काँग्रेस आपल्या आमदारांच्या कुकृत्याचे खापर भाजपच्या डोक्यावर फोडत असून, झारखंड हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले असल्याचा प्रत्यारोप पक्षाचे दिल्लीतील प्रवक्ते सईद जाफर इस्लाम यांनी केला. ‘अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकत्याच केलेल्या चौकशीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता संपूर्ण देशाने काँग्रेसच्या तीन आमदारांना बंगालला मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जाताना पाहिले. काँग्रेसचे बिंग पुन्हा फुटले असून, झारखंडमध्ये भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे,’ असे इस्लाम म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.