sourabh.sharma@timesgroup.com

@sourabhsharmaMT

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे सरकारला पायउतार व्हावे लागले असले, तरी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक तत्कालीन मंत्र्यांचा सरकारी बंगल्याचा मोह कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मंत्र्यांच्या एकूण ४० बंगल्यांपैकी फक्त १८ बंगले रिकामे झाले असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. अद्याप १३ माजी मंत्र्यांनी आणि एका माजी अधिकाऱ्याने बंगले सोडलेले नाहीत. विशेष म्हणजे या रिकाम्या न झालेल्या १४ बंगल्यांमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचे कळते.

राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांसाठी मंत्रालय परिसरात, मलबार हिल आणि आमदार निवास येथील बंगल्यांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात येते. आपल्या आवडीचा बंगला मिळावा यासाठी जवळपास सर्व मंत्र्यांकडून यासाठी जोरदार लॉबिंगदेखील करण्यात येते. मंत्रीमंडळ बरखास्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात; मात्र ठाकरे सरकार पायउतार झाल्यास महिना उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४ बंगले रिकामे झालेले नाहीत. रिकाम्या झालेल्या एका बंगल्याची दुरुस्ती सुरू आहे. पाच ऑगस्टपर्यंतची ही स्थिती असून, त्यानंतर आणखी काही माजी मंत्र्यांनी बंगले सोडले असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, रिक्त न झालेल्या बंगल्यांमध्ये शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे या माजी मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनीही बंगले रिक्त केलेले नाहीत. आव्हाड यांनी तर ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर आपल्या शासकीय निवासस्थानी सर्व कामगारांचे आभार मानत निरोप समारंभही आयोजित केला होता. तरीही त्यांनी हा बंगला अधिकृतरित्या सोडलेला नाही. याशिवाय काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनीही आपला बंगला रिक्त केलेला नाही. मंत्र्यांसोबतच अधिकारी सीताराम कुंटे यांनीही अद्याप आपला बंगला रिकामा केलेला नाही.

यांनी मोह सोडला

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यशोमती ठाकूर, सुनील केदार, बाळासाहेब थोरात, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, अनिल देशमुख, नवाब मलिक, सुभाष देसाई, नितीन राऊत, अस्लम शेख, दिलीप वळसे पाटील, के. सी. पडवी, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, अनिल परब, संजय राठोड.

य़ांचा मोह सुटेना

धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, संदिपानराव भुमरे, श्यामराव पाटील, नाना पटोले (माजी विधानसभा अध्यक्ष), सीताराम कुंटे (माजी अधिकारी)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.