म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिकः विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपणास मनाई करण्याची देवगाव शासकीय आश्रमशाळेतील (ता. त्र्यंबकेश्वर) गेल्या आठवड्यातील घटना राज्यभरात चर्चा आणि संतापाचा विषय ठरला खरा; परंतु, प्रत्यक्षात संबंधित विद्यार्थिनीसोबत असा काही प्रकार घडला नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. शाळेत वृक्षारोपण झाले, त्या दिवशी संबंधित विद्यार्थिनी गैरहजर असल्याचे चौकशी समितीला आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षक निर्दोष असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी अप्पर आयुक्तांकडे सादर केला आहे. दोन महिन्यांपासून शाळेत सतत गैरहजर राहिल्याने कारवाईच्या भीतीतून विद्यार्थिनीने आरोप करताना घडल्या प्रकाराचा बनाव केला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

देवगाव आश्रमशाळेत २५ जुलै रोजी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनीने मासिक पाळी असल्यामुळे शिक्षकाने वृक्षारोपणात सहभाग घेऊ दिला नसल्याचा खळबळजनक आरोप केला होता. ‘ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेले झाड जगणार नाही, असा फतवाच शिक्षकाने काढला असल्याची तक्रार या विद्यार्थिनीने थेट आदिवासी आयुक्तांकडे केली होती. मासिक पाळी असलेल्या तरुणीने झाड लावल्यास ते जळून जाते, असा अजब तर्क या शिक्षकाने लावत अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचाही आरोप झाला होता. आदिवासी संघटनांसह बालहक्क व महिला आयोगानेही तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.

आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकच्या प्रकल्प अधिकारी वर्षा मीना आणि बालहक्क संरक्षण आयोग सायली पालखेडकर या द्विसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालातून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मीना यांनी शाळेचे हजेरी पुस्तक तपासले असता, वृक्षारोपण ज्या दिवशी झाले; त्या १४ जुलै रोजी विद्यार्थिनी शाळेत गैरहजर होती. विशेष म्हणजे सदरची विद्यार्थिनी ही जून महिन्यात चार दिवस, तर जुलै महिन्यात केवळ तीन दिवस शाळेत हजर असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

कारवाईच्या भीतीपोटी बनाव?

संबंधित विद्यार्थिनी ही आदिवासी विभागात काम करणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या संघटनेची सदस्य आहे. सतत गैरहजर राहिल्यामुळे बारावीचे वर्ष वाया जाण्याची तिला भीती होती. विज्ञान शाखेत शिकत असूनही सतत अनुपस्थितीत राहिल्याने वर्गशिक्षकाने तिला जाब विचारला होता. यापुढे गैरहजर राहिल्यास शाळेत बसू न देण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे या विद्यार्थिनीने कारवाईच्या भीतीपोटी मासिक पाळीत वृक्षारोपणापासून रोखल्याचा बनाव केला असण्याची शक्यता चौकशी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

इतर विद्यार्थिनींची परवड

देवगाव शासकीय आश्रमशाळेत चारशे मुली शिक्षण घेत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये संबंधित मुलीच्या आरोपांबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तेथील मुलींना मनस्तापाला सामोरे जावे लागले. बदनामीपोटी काही पालकांनी मुलींना घरी नेण्यासाठी तगादा लावल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. शा‌ळेत सुविधा मिळत नसल्याकडे साऱ्यांनीच सपशेल दुर्लक्ष केले. काही वृत्तवाहिन्यांनी तर केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी जो प्रकार घडलाच नाही, त्याला ठळकपणे प्रसिद्धी दिल्याचा आरोपही काही विद्यार्थिनींनी ‘मटा’ प्रतिनिधीकडे केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.