जोधपूर: हवाई दलाच्या विमानाला राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात अपघात झाला. मिग-२१ विमान गुरुवारी कोसळलं. त्यावेळी विमानात दोन पायलट होते. विंग कमांडर एम. राणा आणि फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल विमानाचं सारथ्य करत होते. बल यांचं कुटुंब त्यांचं पार्थिव नेण्यासाठी राजस्थानला पोहोचलं. त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात संतापजनक प्रकार घडला.

फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल यांचे कुटुंबीय विमानानं राजस्थानला गेलं. त्याच विमानातून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एच. एस. पनाग यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग यांचा भाऊ शेरबीर पनाग प्रवास करत होते. विमानात घडलेला धक्कादायक प्रसंग पनाग यांनी ट्विट केला आहे. ‘दिल्लीहून जोधपूरला जाणाऱ्या विमानातून मी प्रवास करत होतो. फ्लाईट लेफ्टनंट अद्वितीय बल यांचं कुटुंब तिसऱ्या रांगेत माझ्या शेजारी बसलं होतं. विमान जोधपूरला उतरलं. बल यांच्या कुटुंबाला आधी उतरू द्या, त्यांना लवकर जाऊ द्या, अशी सूचना कॅप्टनकडून करण्यात आली. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांनी त्या सुचनेकडे दुर्लक्ष केलं,’ असा घटनाक्रम पनाग यांनी सांगितला.

मला आणि काही प्रवाशांना ओरडावं लागलं. पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील प्रवाशांनी खाली बसावं आणि बल यांच्या कुटुंबाला आधी जाऊ द्यावं यासाठी ओरडण्याची वेळ आली. आपल्या देशातील महिला आणि पुरुषांचं वर्तन पाहून मला धक्काच बसला. बलिदानाबद्दल आपल्याला किती सन्मान वाटतो त्याचं वास्तव या घटनेतून दिसलं, अशा शब्दांत पनाग यांनी सहप्रवाशांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार, मिग-२१ विमानाला प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. गुरुवारी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी बाडमेर येथे विमान कोसळलं. अपघातामागचं कारण शोधण्याचे आदेश हवाई दलाच्या मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत. मिग-२१ विमानं अनेक दशकांपासून भारतीय हवाई दलाच्या सेवेत आहेत. मात्र सुरक्षेच्या बाबतीत या विमानांची कामगिरी चांगली नाही. कित्येकदा या विमानांना अपघात झाले आहेत. त्यात हवाई दलानं जवळपास २०० पायलट गमावले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.