म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बेस्ट दिनाचे औचित्य साधून ७ ऑगस्टपासून बेस्ट उपक्रमाने मुंबईकरांना बेस्ट आगार, स्थानकात पार्किंग सुविधेसाठी मोबाइल अॅपची नवीन सुविधा पुरविली आहे. बेस्टने २०१९पासून आगार, स्थानकात खासगी वाहनांना पार्किंगची सुविधा दिली असून त्यात आता मोबाइल अॅपची नवीन सांगड दिली आहे. त्यासह ‘वॅले’ पार्किंग ही संकल्पनाही राबविण्यात येत आहे.

बेस्टने पार्किंगची समस्या लक्षात घेत २०१९पासून ‘पे अँड पार्क’ योजना सुरू केली आहे. बेस्ट आगार, बस स्थानकात सकाळपासून दिवसभर जागा उपलब्ध असल्याने खासगी वाहनचालकांना त्यांच्या गाड्या उभ्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यास मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता एका कंपनीने विकसित केलेल्या ‘पार्क प्लस’ या अॅपच्या साहाय्याने पे अँड पार्किंग योजनेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. ‘पार्क प्लस’ अॅपच्या सहाय्याने वाहनचालकांना बेस्टच्या बस आगार, बसस्थानकांमध्ये पार्किंगसाठी उपलब्ध जागेची माहिती मोबाइलवर मिळणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्यास तिथे आगाऊ आरक्षण करून पार्किंग करता येईल. त्यासह या अॅपमध्ये वाहनचालकांना डिजिटल पद्धतीने पार्किंग शुल्काचा भरणा करता येऊ शकेल.

संगणकीकृत योजनेंतर्गत वाहनचालकांना स्वयं पार्किंग पद्धतीने आगारात वा स्थानकात गाड्या उभ्या करता येतील. त्यासाठी पहिल्या तीन तासांसाठी दुचाकीला २० रुपये, तीन आणि चार चाकीसाठी पहिल्या तीन तासांसाठी ३० रु., ट्रक-टेम्पोसाठी पहिल्या तीन तासांसाठी ५५ रु., स्कूल बस व खासगी बससाठी पहिल्या तीन तासांसाठी ६० रु. पार्किंग शुल्क आकारण्यात येत आहे.

बेस्टतर्फे ‘वॅले’ पार्किंगचीही सुविधा पुरविली जात आहे. याद्वारे वाहनचालक गाड्या आगाराच्या प्रवेशद्वारावर आणतील आणि तिथून पुढे आगारात ‘पार्क प्लस’ अॅपच्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था केली जाईल. त्याची सुरुवात कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, दिंडोशी, वांद्रे बस आगारांमध्ये केली जाणार आहे. या सेवेत कोणत्याही वाहनासाठी दोन तासांपर्यंत १०० रुपये आकारले जातील. दोन तासांनंतर प्रत्येक तास वा त्या नंतरच्या कालावधीसाठी ३० रु. अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.