म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः या आठवड्यामध्ये सातत्याने रुग्णसंख्येमध्ये होत असलेली वाढ पाहता ही करोना संसर्गाची चौथी लाट आहे का, यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या नियंत्रणात आहे. त्यात मोठ्या संख्येने वाढ झालेली नाही.

मुंबईमध्ये शनिवारी १,७४५ करोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ९४ टक्के रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत. रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णांची संख्या ९९ नोंदवण्यात आली आहे. करोनामुळे शनिवारी मुंबईमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाचे वय ७० वर्षे असून त्यांना मधुमेहाचा दीर्घकालीन आजार होता. करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ८८८ असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मध्यम तसेच तीव्र स्वरूपाच्या लक्षणांसाठी रुग्णालयामध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या आता वाढती असून त्यापैकी ११ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. यापूर्वी रुग्णालयामध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांची संख्या एक ते सव्वा टक्का होती, आज त्यात वाढ होऊन ती दीड टक्क्यांच्या पुढे म्हणजे १.५६ टक्के नोंदवण्यात आली आहे.

तूर्तास निष्कर्ष नाही…

पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्येमध्ये अशाच प्रकारची वाढ होत राहिली तर चौथी लाट आली आहे असे खात्रीदायकरित्या सांगता येईल. आत्ता या संदर्भात निष्कर्ष काढता येणार नाही. राज्यात एकाचवेळी सगळ्या ठिकाणी रुग्णांची संख्येमध्ये वाढ दिसत नाही. ज्या ठिकाणी चाचण्या मोठ्या संख्येने केल्या जातात तिथे रुग्णसंख्या अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे मत संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत मोहिते यांनी व्यक्त केले. मुंबईचा विचार केला तर सर्वच प्रभागामध्ये एकाच वेळी रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. काही ठरावीक प्रभागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसते. जिथे रुग्णसंख्या वाढलेली आहे, तिथे पावसाळ्यामध्ये त्यात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे डॉ. श्रीकांत वैती यांनी लक्ष वेधले.

राज्यात २,९२२ रुग्णांची भर

मुंबई : राज्यात शनिवारी २,९२२ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले. राज्यात सध्या १४,८५८ उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यात दिवसभरात १,३९२ करोनारुग्ण बरे होऊन घरी परतले, तर आजपर्यंत एकूण ७७ लाख ४४ हजार ९०५ करोनारुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९४ टक्के इतके आहे.

मुंबईची करोनास्थिती

एकूण बाधित रुग्ण- १७४५

लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या- १६४६

मृत रुगण- १

एकूण चाचण्या- १४,२२७

बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९७ टक्के

४ जून ते १० जूनपर्यंत मुंबईतील करोनावाढीचा दर- ०.१२२ टक्के

रुग्णदुपटीचा दर- ५६१ दिवसSource link

Leave a Reply

Your email address will not be published.