मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटले यांच्या मतांचा कोटा अचानक वाढवल्याने शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आल्याची चर्चा आज सकाळपासून रंगली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. भाजपकडून कालपासून अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ठरलेल्या गणितानुसार मतं मिळतील. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्यावर अजिबात नाराज नाहीत. आताच माझी त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. मी शरद पवार यांच्याशीही बोललो आहे. कोणीही कोणावर नाराज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेला धाकधूक; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एका निर्णयाने वाढणार संजय पवारांची डोकेदुखी

यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून येतील, असा दावा केला. संध्याकाळी सात वाजता चित्र स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीसाठी काँटे की टक्कर, चुरस वगैरे असल्याचा केवळ भ्रम आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या मतदानात हे आकडे स्पष्ट दिसतील. महाविकास आघाडीला ठरल्यापेक्षा जास्त मतं मिळाली तरी भाजप नेत्यांना धक्का बसू नये, हीच अपेक्षा करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राष्ट्रवादी-शिवसेनेत बिघाडीची चर्चा; महाडिक म्हणाले, ‘आमचे तीन उमेदवार जिंकले हे आत्ताच जाहीर करा’

नेमकं काय घडलं होतं?

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना जिंकवून आणण्यासाठी एक-एक महत्त्वाचे असताना शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या भूमिकेत बदल केल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४२ मतांचा कोटा राखून ठेवला होता. त्यानंतर उर्वरित मतं ही शिवसेनेला दिली जाणार होती. मात्र, आता राज्यसभा निवडणुकीला अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा ४२ वरून ४४ इतका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात आला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाल्याची चर्चा होती.

ही शक्यता खरी ठरल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे दूरगामी पडसाद उमटण्याची शक्यता होती. राज्यसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे आता ही निवडणूक प्रचंड रंगतदार होणार, असे बोलले जात होते. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे आता उद्धव ठाकरे हे प्रचंड नाराज झाले आहेत. शिवसेनेचे अरविंद सावंत, अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काहीवेळापूर्वीच शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण प्रकाराविषयी प्रचंड नाराज असल्याचे शरद पवार यांना कळवल्याची चर्चा होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.