संत ताजुद्दिन बाबांच्या वंशजांना धमकीचे पत्र

सक्करदरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: संत ताजुद्दिन बाबा यांचे वंशज सय्यद तालेफ ताजी यांना ठार मारण्याच्या धमकीचे पत्र मिळाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी राजस्थानच्या युवकाविरुद्ध धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पप्पू गुजर (रा. कमला नेहरूनगर, जोधपूर, राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मंगळवारी ताजी यांना पप्पूने पाठविलेले पत्र मिळाले. ‘प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करणाऱ्या टोळीचा मी सदस्य आहे. या टोळीचे सदस्य नागपुरात आले आहेत. मुसेवालाप्रमाणेच तुमची हत्या करण्यात येईल. तुमच्या वाहनाचा क्रमांकही आमच्याकडे आहे, वाईट परिणामाला सामोरे जाल’, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे. ताजी यांनी या पत्रासह सक्करदरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. ताजी यांना अनेक दिवसांपासून धमकी देण्यात येत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ताजी यांच्या मोठा ताजबाग परिसरातील घरासमोर चोवीस तास सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कन्हान नदीत बुडाले दोन युवक

मौदा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कन्हान नदीत दोन युवक बुडाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. राहुल दशरथ ठोंबरे (वय २५, रा. मौदा) आणि उमेश श्रावण ठाकरे (वय २७, रा. गोरेवाडा) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल व उमेश नातेवाईक आहेत. बुधवारी दोघेही आंघोळीसाठी गेले. राहुल नदीत उतरला. तो बुडायला लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरड केली. राहुलला वाचिवण्यासाठी उमेशही नदीत उतरला, तोही बुडाला. एका नागरिकाने मौदा पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मौदा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. उशिरा रात्रीपर्यंत दोघे आढळले नव्हते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.