ठाणे : एड्सबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या काही औषधांचा ठाणे जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला असून सध्या रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध औषधांचा साठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून औषधे मिळण्यास विलंब होऊ लागला आहे. दुसरीकडे सीएसआर फंडातून ‘डीटीजी’, ‘सीपीव्ही’, ‘आरटीव्ही’ या औषधांच्या ३५० बाटल्या मिळाल्या असून केवळ १५ दिवस पुरतील एवढीच ही औषधे आहेत. या औषधांची कमरता गेल्या दोन महिन्यांपासून जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून विविध राज्यांना औषधांचा पुरवठा केला जात असून ही औषधे राज्यात आल्यानंतर तेथून एआरटी सेंटरला पाठवली जातात. एआरटी सेंटरमधून एचआयव्ही-एड्स संसर्गित रुग्णांना औषधे देण्यात येतात. ठाणे जिल्ह्यात ठाणे, उल्हासनगर, वाशी, कल्याण, भिवंडी, मिरारोड, कळवा अशी एकूण सात एआरटी सेंटर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसापासून ‘डीटीजी’, ‘सीपीव्ही’, आणि ‘आरटीव्ही’ या औषधांचा पुरवठा करण्यास राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून विलंब होत असल्याने जिल्ह्यात या औषधांची मोठी कमतरता भासू लागली आहे. पुढील एक किंवा दोन महिने या संस्थेकडून ही औषधे मिळण्याची शक्यता धूसर आहे.

जिल्ह्यात एड्स संसर्गित रुग्णांची संख्या सुमारे २५ हजाराच्या आसपास आहे. मात्र, डीटीजी, सीपीव्ही आणि आरटीव्ही औषधे घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ हजार ४०० आहे. टीएलडी औषधे घेणाऱ्यांची संख्या सुमारे २३ हजार ५०० इतकी असून टीएलडी औषध दोन ते तीन महिने पुरतील इतकीच आहेत. रुग्णांना ही औषधे नियमित घ्यावी लागत लागत असून काही रुग्णांना एक महिन्याची तर काही रुग्णांना तीन महिन्यांची औषधे देण्यात येतात. मात्र, सध्या या औषधांचा तुटवडा असून ही औषधे उपलब्ध करण्याविषयी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सीएसआर फंड किंवा डीपीडीसीच्या निधीतून औषधे मिळण्याविषयी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत ठाण्याचे जिल्हाधिकारी तसेच महापालिकांकडे पत्रव्यवहार केला आहे.

सीएसआर फंडातून डीटीजी, सीपीव्ही आणि आरटीव्ही या औषधांच्या केवळ ३५० बाटल्या मिळाल्या असून केवळ १५ दिवस पुरतील इतकीच ही औषधे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही-एड्स संसर्गित रुग्णांना औषधांची कमतरता भासू नये म्हणून राज्यपातळीवर पाठपुरावा तसेच स्थानिक पातळीवर प्रशासन, सीएसआरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.