पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. याचविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विविध शहरात आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादीचे नेते मंडळीही चांगलेच आक्रमक झाले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल मिटकरी, रोहित पवार यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.
“वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही. अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजप नेत्यांचं झालं असावं”.
“छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजितदादांना बोलू दिले नाही… असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा!”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
देहूमध्ये नेमकं काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आज देहूत शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांना संबोधित केलं. मात्र मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर थेट पंतप्रधान मोदींचं भाषणासाठी नाव पुकारलं गेलं. यावेळी मोदींनीही अजितदादांना बोलू द्या, असा इशारा केला. पण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने थेट मोदींचं नाव घेतल्याने ते भाषणासाठी डायसकडे गेले. अधोरेकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे राज्यातल्या सरकारचे प्रतिनिधी, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांची कार्यक्रमाला उपस्थित लावली होती. पण असं असतानाही अजितदादांना बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.