मुंबई : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेना, मनसे यांच्याकडून टीकेचा सूर उमटत आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यासंदर्भात केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती केसरकरांनी दिली

दीपक केसरकर काय म्हणाले?

राज्यपालांचं वक्तव्य हे राज्याचा अपमान करणारं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांच्याबाबत केंद्र शासनाला लिहिण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. अशी विधानं पुन्हा येऊ नयेत, यासाठी केंद्र त्यांना सांगितलं जाऊ शकतं. मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, अनेक समाजांचं त्यात योगदान आहे,
सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे, ही वस्तुस्थिती आहे. गुजराती-राजस्थानी हे दोनच समाज का, पारसींचं योगदान ही औद्योगिक क्षेत्रात आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या योगदानाबद्दल बोलायचं असतं, मात्र त्यांनी पैसा काढून घेतला, तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही, हे वक्तव्य मुंबईबाबात अभ्यास नसल्याचं द्योतक आहे, असं दीपक केसरकर ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

आरबीआयसह अनेक बँकांचं हेडक्वार्टर असल्याने मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी झाली. पूर्वी एकूण करातील ४० टक्के हिस्सा मुंबईतून येत असल्याने हा निर्णय झाला, मात्र यात कुठल्याही एका समाजाचं नाही, तर सर्व समाजांचं योगदान आहे. पंजाबी, मारवाडीही आहेत. अक्षरशः लाठी-लोटा घेऊन काही जण इथे आले, त्यांना मुंबईने आश्रय दिला, मोठं केलं. पण कोणी बाहेरची गुंतवणूक घेऊन इथे आलं नाही, असं केसरकर म्हणाले.

केंद्र शासनाला कळवू की ज्यांची नियुक्ती राज्याचं घटनात्मक प्रमुख म्हणून केली, त्यांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावरुन आल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांना भेटू. ते या मुद्द्यावर संवेदनशील असतात. मराठी माणसाच्या तीव्र भावना केंद्रापर्यंत पोहोचवू
राज्यपाल पदावर असताना वक्तव्यं टाळायला हवीत, अशी समज त्यांना देण्यात येईल, अशी अपेक्षाही केसरकरांनी व्यक्त केली.

राज्यपाल काय म्हणाले होते?

कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

हेही वाचा : नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, गुजरातींची तळी उचलण्यावरुन मनसेचा भडका

शिवसेनेकडून समाचार

“राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. अन पालकाने राज्याप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे. परंतु महामहीम कोश्यारीजी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. चला महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया” असा टोला सुषमा अंधारे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

मनसेची भूमिका काय?

“ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे” अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

हेही वाचा : ७५ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं; पाकिस्तानात पोलिस उपअधीक्षकपदी प्रथमच हिंदू महिला

“राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये” असंही देशपांडेंनी सुनावलं. मनसे आणि भाजपची गेल्या काही काळात जवळीक वाढत असल्याने या मुद्द्यावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधणार का? असा प्रश्न विचारला असता, राज्यपाल हे काही भाजपचे नाहीत, ते न्यूट्रल असतात, त्यामुळे त्यांनाच आम्ही सांगू, असंही स्पष्टीकरण देशपांडेंनी दिलं.

काँग्रेसचा आक्षेप

राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे, अशी भूमिका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी घेतली आहे. सचिन सावंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा : डीजे बंद करा, माईकही नको, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचं मालेगाववासियांना खणखणीत आवाहनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.