अहमदनगर : “आमदार रोहित पवार, आपल्या मतदारसंघात कुकडीचे आवर्तन न मिळाल्याने गंगाजलाअभावी शेती जळत चालली आहे. वाराणसीतल्या गंगेचं पवित्र गंगाजल घेऊन महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळांना अभिषेक करण्याची आपल्याला सुचलेली कल्पना नक्कीच चांगली आहे. पण अगोदर तहानलेल्या शेतकऱ्यांवर कुकडीच्या गंगाजलाचा वर्षाव करा”, अशी मागणी नगर भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी केली आहे.

रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या काही भागांत पाण्याचा मोठा प्रश्न आहे. ऊसाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा पूर्ण धीर सुटला आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी वाराणसीतल्या गंगेचं पवित्र गंगाजल घेऊन महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळांना अभिषेक करण्याची कल्पना आखली आहे. त्यांच्या या कल्पनेवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मतदारसंघात पाण्याचा मोठा प्रश्न असताना रोहित पवार यांच्या ‘गंगाजल अभिषेका’वर टीका होऊ लागली आहे.

“थेरवडी व दुरगावचा तलाव प्रथमच कोरडा पडला आहे. जिवापाड जपलेल्या फळबागा जळताना पाहून आणि पावसाने ओढ दिल्याने राहिलेली शेती जळत असताना राजकीय कुरघोडीने आमदार रोहित पवार यांनी घाई-घाईने जाहीर केलेल्या ९ जूनच्या कुकडीच्या खोट्या आवर्तनाच्या गंगाजलची वाट पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील ते गंगाजल ओघळत आहे”, असं म्हणत तहानलेल्या शेतकऱ्यांवर कुकडीच्या गंगाजलाचा वर्षाव करण्याची मागणी सचिन पोटरे यांनी रोहित पवार यांच्याकडे केली आहे.

वाराणसीतल्या गंगेचं पवित्र गंगाजल घेऊन महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळांना अभिषेक करण्याची आपल्याला सुचलेली कल्पना नक्कीच चांगली आहे. परंतु तेवढीच ताकत पुणे जिल्ह्याच्या पुढाऱ्यांच्या मनमानीला विरोध करून मुंबई मंत्रालयातून जर आपण गेली अडीच वर्षात मतदारसंघात कुकडीचे गंगाजल नियमित व वेळेवर सोडले असते तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेच नसते, असा टोलाही सचिन पोटरे यांनी रोहित पवारांना लगावला आहे.

स्वराज्यध्वजच्या वाहनावर छत्रपतींचा नसलेला फोटो आणि या संकल्पनेची सुरवात सदगुरु गोदड महाराज यांच्या तीर्थस्थळापासून चालू केली परंतु या वाहनावरही सद्गुरु यांचा व कुठल्याच देवतांच्या नसलेल्या प्रतिमा व आपला दिमाखात झळकत असलेला फोटो पाहून आपण नेहमी करत असलेल्या भावनिक राजकारणाचा देखावा आणि नव्या पर्वाचा बुरखा फाटल्याशिवाय राहत नाही, असा इशाराही त्यांनी रोहित पवार यांना दिला.

महाराष्ट्रातल्या तीर्थस्थळांच्या अभिषेकाआधी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीला कुकडीच्या गंगाजलाने अभिषेक केला असता तर नक्कीच शेतकरी राजाही प्रसन्न झाला असता, असंही पोटरे यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.