कोल्हापूर : ‘वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही’, असं म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना सेनेचे पराभूत उमेदवार तथा शिवसेना नेते संजय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “राजेंचं ते विधान खेदजनक आहे. मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे आला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे”, अशा शब्दात संभाजी पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंना प्रत्युत्तर दिलंय.

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. या विजयावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला. वाघाची कातडी ओढून वाघ होता येत नाही, अशी खरमरीत टीका संभाजीराजे छत्रपतींनी तुकोबांच्या अभंगाच्या ओळी ट्विट करत शिवसेनेवर केली. त्यांच्या याच टीकेला संजय पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय.

‘…तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी का गेला होतात?’

“जर वाघाचं कातडं पांघरुन वाघ होता येत नाही. तर अशा वाघांकडे पाठिंब्यासाठी तुम्ही का गेला होतात? मला मतं द्या म्हणत तुम्हीच पाठिंब्यासाठी शिवेसेनेकडे गेला होतात. तुम्हाला कोण बोलवायला आलं नव्हतं. संभाजीराजेंचा बोलविता धना कुणीतरी वेगळाच आहे. सर्कशीतले वाघ वेगळे असतात आणि जंगलातले वाघ वेगळे असतात. छत्रपती म्हणून तुमचा कायमच आदर राखत आलोय, इथून पुढेही राखेन. पण कृपा करुन आपण शिवसेनेवर टीका करु नये”

…तर निकाल काही वेगळा लागला असता

“मी निवडून येण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी दगाफटका झाला. सेनेचा उमेदवार म्हणून नाही तर आपला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केला असता तर निकाल काही वेगळा लागला असता”, अशी खंतही संजय पवार बोलून दाखवली.

राज्यसभेत सेनेचा पराभव, संभाजीराजेंचा निशाणा

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ।।
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ।।

असं संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं. संभाजीराजे छत्रपती यांच्या ट्विटचा रोख हा शिवसेनेकडे होता. त्यांनी या ट्विटमधून शिवसेनाचा उल्लेख टाळत सेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होता येत नाही , असंच त्यांना ट्विटमधून सांगायचं होतं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.