मुंबई : एखाद्या पक्षाचा आमदार लोकांच्या लक्षात राहत नाही, पण अपक्ष आमदार बच्चू कडू यांना ओळखत नाही, असा माणूस सापडणं विरळा आहे. आपल्या कामाने गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा आमदार म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांचं व्यक्तिमत्त्व प्रचंड भावनिक, संवेदनशील पण लोकांना न्याय हक्क मिळवून देताना ते प्रखर आक्रमक होतात. प्रशासनातील अधिकाऱ्यांना बच्चू कडू घाम फोडतात. त्यांच्या आंदोलनाची स्टाईल निराळी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. त्यांनीही कोणतीही कृती केली की समाजमाध्यमांवर त्याची चर्चा होतीच. त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

उद्या विधान परिषदेची निवडणूक असल्याने सगळ्याच पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. आमदारांच्या पंचतारांकित हॉटेलमधील मुक्कामासाठी सगळ्याच पक्षांना प्रचंड पैसे मोजावे लागत आहेत. मात्र मंत्री असूनही बच्चू कडू आज मुंबईतील एका साध्या टपरीवर थांबले. पारले जी बिस्कीट ते ही पाण्यासोबत खाण्याची मजा त्यांनी घेतली.

पारलेजी अनेकांना आधार देणारे बिस्कीट, पाणी व पारलेजी याची जोड काही वेगळीच आहे. अनेकदा रात्री अपरात्री पारलेजीने आम्हाला आधार दिला. आज मुंबईत कामानिमित्त टपरीवर तोच अनुभव परत आला, असं बच्चू कडू यांनी ट्विट करुन सांगितलं.

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता

अकोला जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग जणांसाठी काम करणारा नेता म्हणून राज्यभर ओळख आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आतापर्यंत बच्चू कडू यांनी केलंय. बेघर आणि अपंग लोकांसाठी बच्चू कडू यांचं मोठं काम आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.