पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणीच केला नाही, असं मत पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडलं होतं. पवारांच्या याच विधानाला आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या लिखाणाला पर्याय द्या”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना लगावला आहे.

महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे आयोजित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कारा २०२२ आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. डॉ. गो. बं. देगलूरकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.

“मला या व्यासपीठावरून हेच मांडायचं होतं की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे, त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केलं ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याच्यापासून लोकांना विचलित करतात. तुम्ही पर्याय द्या… जे आहे ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे ते खरं असेल, त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

“महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता ‘कुळवाडी भूषण’ असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला”, असं पवार म्हणाले होते. नुकतेच पुण्यात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन झाले त्या कार्यक्रमात शरद पवारांनी हे मत मांडले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.