औरंगाबाद : शेतातून मोल-मजुरी करुन घरी परतताना चुलती आणि पुतणीला भरधाव टेम्पोने चिरडल्याची घटना वैजापूर तालुक्यातील मणूर येथे शुक्रवारी घडली आहे. या अपघातामध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाला. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (वय ५६), मंगल आसाराम दवंगे (वय ३८) अशी मृत चुलती-पुतणीची नावे आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर चालकाने आपले वाहन जागेवरच सोडून पळ काढला. घटनास्थळी शिऊर पोलीस दाखल झाले होते. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोपी टेम्पोचालकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.