म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून माजी खासदार संभाजीराजे हे येत्या 9 ऑगस्ट पासून परिवर्तन क्रांती यात्रा काढणार आहेत. ‘या दिवशी तुळजापुरात या’ अशी हाक त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना दिली आहे. यामुळे आता राज्यात संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेची ताकद वाढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी घेण्यास विनंती केली, पण उमेदवारी न घेता संभाजीराजांनी सेनेकडे पाठिंबा मागितला. तो न दिल्यामुळे ते मैदानातून बाहेर पडले. याच दरम्यान, त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून राज्यात विविध प्रश्न सोडवण्याबरोबरच संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी घेतली. प्रसंगी ही संघटना राजकारणातही उतरेल असे संकेत ही त्यांनी दिले.

दहा दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर येत्या 9 ऑगस्ट पासून परिवर्तन क्रांती यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात तुळजापुरात करणार असल्याचे त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. यामुळे आता राज्यात संभाजीराजांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, अशी अट शिवसेनेने घातली होती. मात्र, संभाजीराजे यांनी पक्ष प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने देखील संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याऐवजी संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. संभाजी राजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द फिरवला, असे म्हणत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. हीच निवडणूक पुढे जाऊन राज्यातील सत्तांतराचे कारण ठरली होती.

या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात तुळजापूर येथून होईल. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंद देखील ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेली होती. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केल्याने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.