विशाखापट्टनम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी-२० थोड्याच वेळात विशाखापट्टनम येथे सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीत टीम इंडियाचा पराभव झाल्याने ही मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला ही मॅच जिंकण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिनही आघाडींवर शानदार कामगिरी करावी लागले.
तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय चाहत्यांची नजर संघातील जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्यावर राहिल. या सामन्यात भुवीला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एक महाविक्रम करण्याची संधी आहे. जर त्याने या लढतीत एक विकेट घेतली तर तो टी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरले. सध्या भुवी वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडचा टिम साउदी यांच्यासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
टी-२०मधील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट
सॅम्युअल बद्री- ५० डावात ३३ विकेट
भुवनेश्वर कुमार- ५९ डावात ३३ विकेट
टिम साउदी- ६८ डावात ३३ विकेट
शाकिब अल हसन- ५८ डावात २७ विकेट
जोश हेजलवुड- ३० डावात २६ विकेट
द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारने शानदार गोलंदाजीकरत ४ विकेट घेतल्या होत्या. भुवीच्या या कामगिरीनंतर देखील भारताचा पराभव झाला होता. आता तिसऱ्या लढतीत देखील त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित असेल. भुवीने २०० सामन्यात २६७ विकेट घेतल्या आहेत. त्यापैकी ६३ कसोटी, १४१ वनडेत आणि ६७ टी-२० मधील आहेत.