Urmila Matondkar on her comeback: लक्षवेधी आणि दर्जेदार भूमिका पडद्यावर साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अशी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची ओळख आहे. उर्मिला सध्या ‘डान्स इंडिया डान्स- सुपर मॉम्स’ या कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेत्री भाग्यश्रीदेखील तिच्यासह परिक्षकाच्या खुर्चीत आहेत. याठिकाणी अनेकदा स्पर्धकांसह उर्मिलाच्या डान्सचाही जलवा पाहायला मिळतो. दरम्यान अभिनेत्री छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत असली तरी ती सिनेमातून पुनरागमन करणार का, हा सवाल प्रेक्षक वेळोवेळी विचारतात. दरम्यान ‘रंगीला’ गर्लला मोठा पडदा नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्म्स खुणावत असल्याचे दिसते. ओटीटीवर काम करण्याची इच्छा अभिनेत्रीने व्यक्त केली. शिवाय तिने सामाजिक विषयावर भाष्य करण्याबाबतही तिची मतं मांडली आहेत.

​दहा वर्षांनी रिॲलिटी शोची परीक्षक

अभिनेत्री दहा वर्षांनी पुन्हा एकदा रिॲलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत बसली आहे. याबाबत तिचा अनुभव विचारला असता उर्मिला म्हणते की, ‘कुठलीही भारतीय स्त्री जन्माला आल्यापासून मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई अशा विविध जबाबदाऱ्या निभावत असते. हे सगळं करताना तिचे विचार, स्वप्नं, अपेक्षा, आकांक्षा हरवून जातं. तिच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम ‘डान्स इंडिया डान्स-सुपर मॉम्स’ हा मंच करतंय. अशा कार्यक्रमाचा मी भाग असल्याचा मला आनंद आहे’

​सोशल मीडियामुळे मोठा बदल

रिॲलिटी शोमधील बदलाबाबत अभिनेत्री म्हणते की, ‘सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. या माध्यमामुळे कोणतीही गोष्ट शिकणं आता सोपं झालंय. त्यामुळे बरेच प्रतिभावान स्पर्धक समोर येतात. सोशल मीडिया, युट्यूब यामुळे गुणवत्तेचा दर्जा उंचावलाय. आता शिकवणी नाही किंवा प्रशिक्षणासाठी कुठे जाऊ शकत नाही असं कोणीही म्हणू शकत नाही. जिद्द असली पाहिजे. जिद्दीमुळे तुम्ही कुठेही जाऊ शकता आणि काहीही शिकू शकता. रिॲलिटी शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांमध्ये दिसून येणारा हाच बदल प्रकर्षानं जाणवतो.’

​चित्रपटांमध्ये पुनरागमन कधी?

अभिनय क्षेत्रात उर्मिलाच्या कमबॅकसाठी चाहते उत्सुक आहेत. पण चित्रपटांपेक्षा ओटीटीवर काम करण्यासाठी उर्मिला उत्सुक आहे. ती म्हणते, ‘चित्रपटांपेक्षा मला ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाविषयी जास्त उत्सुकता आहे. त्यामध्ये वैविध्यपूर्ण कलाकृती आणण्याची जोखीम पत्करली जाते. माझं अभिनयक्षेत्रातलं पुढचं पाऊल ओटीटीच्या दिशेनेच असेल. मी आजवर केलेल्या चित्रपटांमध्ये वेगळेपण होतं. असंच काही वेगळं असलं तरच ओटीटीवर पदार्पण करेन. सिनेसृष्टीप्रमाणेच ओटीटीविश्वातही मी तितक्याच ताकदीनं आणि यशस्वीरित्या आगमन करेन.’

​दिग्दर्शक किंवा निर्माती होण्याचा विचार?

अभिनय क्षेत्रात दर्जेदार काम करणारी उर्मिला निर्माती किंवा दिग्दर्शक होणार का असे विचारल्यावर तिने नाही असे उत्तर दिले. उर्मिला म्हणते की, ‘राजकारण, समाजकारण या क्षेत्रातही मी सक्रिय असते. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसंच वैयक्तिक आयुष्यही आहे. दिग्दर्शन किंवा निर्मिती क्षेत्रात बऱ्याच गोष्टी आहेत. ते खूप जबाबदारीचं काम आहे. त्यासाठीही व्यवस्थित वेळ द्यायला हवा. त्यामुळे सध्या तरी याबाबत काही विचार नाही. पुढचं माहिती नाही!’

​’समाजात काय चाललंय याचं भान असणं आवश्यक’

अभिनेत्री विविध विषयांवर नेहमी बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसते, इतर काही कलाकारांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळं आहे. याबाबत काय वाटतं विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘एक व्यक्ती म्हणून मला जे वाटतं ते मी बोलते. माझा जन्म सामाजिक ऋणानुबंध पाळणाऱ्या घरात झाल्यामुळे माझ्यात सामाजिक कृतज्ञतेची भावना आहे. त्यामुळे मी वेळोवेळी व्यक्त होते. एखादी गोष्ट आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही तोवर ‘मी कशाला त्याच्यात पडू’ हा विचार फक्त कलाकारच नाही तर सगळेच करतात. पण आता आपण त्यापलीकडे विचार करणं गरजेचं आहे. आपल्या देशात, समाजात काय चाललंय याचं भान ठेवणं आणि त्याविषयी विचार करणं आवश्यक आहे.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.